वरखेडे ता. चाळीसगाव : येथील गिरणा नदी क्षेत्र आणि धरण पात्रातील गट क्रमांक ३९ मधील वाळू लिलाव करण्याबाबत महसूल प्रशासने २ सप्टेंबर रोजी आयोजीत केलेल्या विशेष ग्रामसभेत वाळू लिलावास विरोध करण्यात आला. भूजल पातळी खालावण्यासोबतच संभाव्य पाणी टंचाईच्या भितीमुळे ग्रामसभेने वाळूच्या लिलावास विरोध केला.यावेळी चाळीसगाव विभागाचे प्रांताधिकारी शरद पवार यांनी वाळू लिलावाबाबत ग्रामसभेपुढे थोडक्यात विषय मांडला. त्यात त्यांनी महाराष्ट्र शासनाने महसूल व वनविभागाच्या गौण खनिजाबाबत ३ जानेवारी २०१८ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार वाळू लिलावाबाबत ग्रामसभेसमोर प्रस्ताव ठेवल. परिपत्रकाप्रमाणे १ कोटी पर्यंत लिलाव गेल्यास ग्रामपंचायतीला २५ टक्के रक्कम मिळेल. २ ते ३ कोटीला २० टक्के तर जास्तीत जास्त रक्कम ६० लाख रुपये ग्रामपंचायतला दिले जातील, ग्रामसभेने अनुमती द्यावी, असे सांगितले.मात्र ग्रामसभेने लिलावाला एकमताने विरोध केला. प्रशासनाकडून तहसीलदार कैलास देवरे यांनी विरोधाचे कारण विचारले असता, ग्रामसभेकडून माजी सरपंच प्रदीप पवार, दिलीप जगताप, अजबसिंग पवार, संजय कच्छवा, सुरसिंग पवार, महेंद्रसिंग पवार, ललित कच्छवा, भाऊसाहेब जगताप, व सरपंच अर्चना पवार यांनी विरोधाची कारणे विस्तृतपणे दिली. यात प्रामुख्याने वाळू लिलावामुळे परिसरातील भूजल साठा खालावेल व पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण होईल असे अनेक कारणे देत कडाडून विरोध केला.तसेच पुढे सांगितले की, धरणाचे काम पूर्ण होईपर्यंत येथील गिरणा नदीपात्रातून वाळू उचलू देणार नाहीत, तसेच पुढे धरणाचे काम पूर्ण होईल त्याच दिवशी धरणाच्या आतील भागातील वाळू लिलावाचा विषय ग्रामसभेपुढे आणावा.यानंतर या ग्रामसभेने एकमताने वाळू लिलावाच्या विरोधात ठराव पारीत केला.यावेळी ग्रामसेवक बी. पी. पाटील यांनी ठराव लिहिला व वाचून दाखवला. याप्रसंगी नायब तहसिलदार सोनवणे, मंडळ अधिकारी लोखंडे, तलाठी शेळके आदी उपस्थित होते.
वाळू लिलाव करण्यास वरखेडे ग्रामसभेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:21 AM
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे परिसरातील भूगर्भातील जलपातळी खालावण्याच्या भितीमुळे रविवारी आयोजीत ग्रामसभेत वाळू लिलावास जोरदार विरोध करण्यात आला.
ठळक मुद्देग्रामसभेत वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी लिलावाबाबत ठेवला होता प्रस्तावग्रामसभेत एकमताने वाळू लिलावाला विरोधाचा ठराव पारीत