जळगाव : धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून यात वाघूर धरणाच्या साठ्यात झपाटाने वाढ होऊन धरणसाठा शंभरीपर्यंत पोहचला आहे. तसेच गिरणा धरण साठाही ८० टक्क्यांच्याजवळ पोहचला असून हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये २४.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वाघूर धरण साठ्यात चारच दिवसात ३.४९ टक्क्यांनी वाढ होऊन हा साठा ९९.३० टक्क्यांवर पोहचला आहे. धरणाचे दोन दरवाजे पाच सें.मी.ने उघडण्यात आले आहेत.यंदा ३० आॅगस्ट रोजी वाघूर धरणात ९९.३० टक्के पाणीसाठा असला तरी गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ४७.२४ टक्के पाणीसाठी होता. त्यामुळे आताचा साठा पाहिला तर यंदा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेच दुप्पटपेक्षा अधिक साठा आहे.गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरण साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगांमध्ये दररोज पाऊस होत असल्याने वाघूर धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळे जळगाव व जामनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ८२.७५ टक्के झाला. यात वाढ सुरूच राहून तो १४ आॅगस्ट रोजी ८९ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर आता आठवडानंतर पुन्हा चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन रविवार, २३ आॅगस्ट रोजी धरण साठा आता ९३.०१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर २६ आॅगस्ट रोजी ९५.८१ टक्के साठा झाला होता. त्यानंतर चार दिवसात पुन्हा जलसाठ्यात ३.४९ टक्क्यांनी वाढ होऊन हा साठा ९९.३०टक्के झाला आहे. गिरणा धरणात आवक सुरू असल्याने धरण साठा ७८.५८ टक्क्यांवर पोहचला आहे. ६ जुलै रोजी धरणात ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ४२.४९ टक्क्यांवर पोहचला.त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी हा साठा ४५.६३ टक्के झाला होता. २१ रोजी हा साठा ६०.३६ झाला व आता दोन दिवसात त्यात पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन हा साठा २३ आॅगस्ट रोजी ६३.६६ टक्के झाला. त्यानंतर २६ रोजी धरणसाठा ६९.३८ टक्के झाला. वाढ सुरूच राहून ३० आॅगस्ट रोजी हा साठा ७८.५८ टक्के झाला आहे.हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे दररोज उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या २४ दरवाजे पूर्ण उघडे असून यातून ६५ हजार ६२४ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या २५.९६ टक्के साठा आहे.वाघूर धरणाचे दोन दरवाजे उघडलेवाघूर धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने व धरण साठा शंभरीच्या उंबरठ्यावर असल्याने धरणातून पाण्याची विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी रात्री धरणाचे दोन दरवाजे पाच से.मी.ने उघडण्यात आले असून धरणातून सध्या ५८७ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वाघूर धरण शंभरीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:10 AM