लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सावखेडा शिवारातील वाघनगर, तसेच परिसरात वाघूर धरणातील पाण्याचा पुरवठा शुक्रवारपासून सुरू होणार असून, याची चाचणी यशस्वी झाली आहे. या पाणीपुरवठ्यामुळे या भागातील ३० हजार नागरिकांची तहान भागविली जाणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते याचा शुक्रवारी शुभारंभ होणार आहे.
२६.६५ किलोमीटरवरून धरणाचे पाणी आणताना चार वर्षांपासून अडथळ्यांची शर्यत सुरू होती. अखेर हे काम पूर्ण झाले असून, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे. वाघनगरसह परिसरातील कॉलन्या या महापालिका हद्दीत असल्या तरी त्यांचा समावेश जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होतो. या भागात सुमारे ३० हजार नागरिक राहत असून, अद्यापही येथे महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणा उभारलेली नाही. परिणामी, या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी विहीर, कूपनलिका आणि टँकर आदींवर अवलंबून राहावे लागते. या भागाची समस्या लक्षात घेऊन गुलाबराव पाटील यांनी वाघूर धरणावरून या भागात थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली होती.