विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर जळगाव व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी १.९४ टक्क्यांनी घट होऊन तो ६५.०८ टक्क्यांवरून ६३.१४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणात पाणीसाठा कमी आहे. या साठ्यामुळे वर्षभर चिंता नाही. मात्र, पावसाची दडी पाहता दररोज पाण्याचा वापर जपून करणेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे सध्याच्या स्थितीवरून लक्षात येत आहे.
यंदाच्या पावसाळ्यातील दीड महिना उलटला आहे. या कालावधीत वाघूर धरणात वाढ झाली नाहीच, उलट घट झाली आहे. यंदा सलग जोरदार पाऊस नसला तरी गेल्या दोन वर्षांपासून वाघूर व गिरणा धरण १०० टक्के भरल्याने त्यात चांगला जलसाठा राहण्यास मदत झाली. मात्र, यंदा पावसाने सर्वांची चिंता वाढविली आहे. एकीकडे शेतातील खरीप पिके पावसाअभावी करपू लागली असताना धरण साठ्यात वाढ न झाल्यास रब्बी पिकांचीही चिंता राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरण भरण्यासाठीही सलग जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यात जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरण साठ्यावर सर्वांचे लक्ष असते.
वाघूर धरण क्षेत्रात पाऊस नाही
जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये किरकोळ वाढ नोंदविली गेली असली तरी जळगाव व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणाच्या साठ्यात जून महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत १.९४ टक्क्यांनी घट झाली आहे. १ जून रोजी या धरणात ६५.०८ टक्के साठा होता तो आता ६३.१४ टक्क्यांवर आला आहे. सध्या धरणात ५.५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. जळगाव जिल्ह्यात पाऊस न होण्यासह वाघूर नदीचे उगमस्थान असलेल्या अजिंठा डोंगर रांगेतही जोरदार पाऊस नसल्याने धरणात पाहिजे तशी आवक होत नाही.
गेल्या वर्षापेक्षा १५ टक्के कमी साठा
सन २०१९, २०२० अशी सलग दोन वर्षे जिल्ह्यावर तसेच वाघूर धरण क्षेत्रात वरुणराजाची कृपा झाल्याने वाघूर धरण दोनही वर्षे १०० टक्के भरले होते. त्यात गेल्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत धरण ७८.१८ टक्के भरले होते. यंदा मात्र, १८ जुलै रोजी धरणात फक्त ६३.१४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
‘वाघूर’मध्ये आवक नाही, ‘हतनूर’चा मात्र दररोज विसर्ग
जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांची स्थिती पाहता वाघूर व गिरणा धरणात आवक वाढून जलसाठा वाढीची प्रतीक्षा आहे. मात्र, दुसरीकडे हतनूर धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे हतनूर धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. मुळात या धरणात गाळाचे प्रमाण जास्त असल्याने जास्त पाणीसाठा ठेवता येत नसल्याने हा विसर्ग केला जातो.
जळगाव शहराला दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा
जळगाव शहरात दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला लागणारे हे पाणी पाहता प्रत्येक पावसाळ्यात धरणात पाण्याची आवक चांगली असणे महत्त्वाचे ठरते. शहराला दररोज लागणारे पाणी पाहता पुढील पावसाळ्यापर्यंत चिंता नाही. मात्र, पाऊस गायब झाल्यास चिंता वाढू शकते. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे ठरणार आहे.
उर्वरित दोन महिन्यांत अधिक पावसाची अपेक्षा
यंदा हवामान खात्याने जून व जुलै महिन्यात पावसाचा कमीच अंदाज वर्तविला होता. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन महिन्यात जोरदार पाऊस होऊन शेत शिवार बहरण्यासह वाघूर धरण साठ्यात वाढ होण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
धरणसाठा व पाणीपुरवठा स्थिती
- वाघूर धरणात असलेला साठा - ६३.१४ टक्के (५.५४ टीएमसी उपयुक्त साठा)
- शहराची लोकसंख्या - ६,००,०००
- शहराला दैनंदिन होणारा पाणीपुरवठा - १०० एमएलडी
- शहरातील पाण्याच्या टाकी - ५
- शहरातील नळ जोडणी - ७१,०००