कोविशिल्डचेही डोस संपले : आज शहरात लसीकरण बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसींचा पुरवठा हा एक दिवसाला पुरेल एवढाच. तोही एका दिवसाआड मिळत असल्याने पुन्हा एकदा मंगळवारी शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे कोव्हॅक्सिनचे डोसेस शासकीय यंत्रणेत प्राप्त होत नसल्याने पहिला डोस घेतलेल्या २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना याची प्रतीक्षा कायम आहे.
सोमवारी लसीचा मर्यादित पुरवठा असल्याने शहरातील महापालिकेच्या तीनच केंद्रांवर लसीकरण झाले. यानंतर रोटरी व रेडक्रॉस हे दोनही केंद्रे सुरू होती. मात्र, हा साठा एका दिवसाचाच असल्याने मंगळवारी महापालिकेचे केंद्र बंद राहणार असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले. जिल्हाभरात कोव्हॅक्सिन घेतलेल्यांची संख्या ४० हजारांवर असून यापैकी २० हजारांवर नागरिकांचा दुसरा डोस अद्यापही बाकी आहे. कोव्हॅक्सिन एका खासगी केंद्रांवर उपलब्ध झाली आहे. मात्र, अद्याप शासकीय यंत्रणेत ती उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.