ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15 - जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सिटीस्कॅन मशिनचे उद््घाटन तर झाले मात्र प्रत्यक्ष रुग्णसेवेत येण्यासाठी या सुविधेची रुग्णांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. या मशिनची चाचणी व कार्यालयीन प्रक्रिया होणे बाकी असल्याने शनिवारी तपासणी होऊ शकल्या नाहीत.जिल्हा रुग्णालयात या पूर्वी असलेले सिटीस्कॅन मशिन कालबाह्य झाल्याने गेल्या सहा वर्षांपासून ही सुविधा बंद पडलेली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. त्यानंतर दीड वर्षापूर्वी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध झाल्याने 3 कोटी 41 लाख रुपये किंमतीचे अद्यायावत सिटीस्कॅन मशिन रुग्णालयाला मिळाले. मात्र कोणत्या न कोणत्या कारणाने ते सुरू होऊ शकले नाही. अखेर त्याच्या खोलीचे काम पूर्ण होण्यासह इतर काम झाले. मात्र त्याच्या चाचणी व इतर कार्यालयीन प्रक्रिया होणे बाकी आहे. असे असले तरी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा करार झाला आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते या सीटीस्कॅनचे उद्घाटन उरकण्यात आले. उद्घाटनानंतर येथे लगेच ही सुविधा सुरू होण्याची अपेक्षा असताना मात्र तसे झाले नाही. चाचणीच झालेली नसताना ते सुरू तरी कसे होईल ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सिटीस्कॅनचा शुभारंभ झाल्याचे समजल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला व आता सीटीस्कॅन करता येईल, यासाठी येथे विचारणा होऊ लागली. मात्र त्यांचा हिरमोड झाला. चाचणी झाली नसल्याने ते सुरू करता येत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आहे.
मग उद््घाटनाची घाई का?सिटीस्कॅन मशिन प्रत्यक्ष रुग्णसेवेत येऊ शकत नाही, असे असताना केवळ उद्घाटनाची घाई का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.