लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत अडीच वर्षांतच सत्ता गमावण्याची वेळ भाजपवर आल्यानंतर भाजपने २७ बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर करून आता महिना उलटला असून देखील नगरसेवकांना आतापर्यंत कोणतीही नोटीसदेखील बजावण्यात आलेली नाही. कोरोनामुळे भाजपच्या याचिकेवरील कामकाज ही अद्यापपर्यंत होऊ शकलेले नसून आता पुढील महिन्यातच याबाबत कामकाज होणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
मनपाच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या आधी भाजपच्या, २७ नगरसेवकांनी शिवसेनेचा महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देत महापालिकेत मोठे सत्तांतर घडवून आणले. याविरोधात भाजपने बंडखोर नगरसेवकांविरोधात नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे संबंधित नगरसेवक अपात्र करण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली आहे. याबाबत भाजपकडून ॲड. सतीश भगत हे काम पाहत आहेत. मात्र, कोरोनामुळे या याचिकेवर अद्यापपर्यंत कोणतेही कामकाज झालेले नाही. तसेच ॲड. सतीश भगत यांनादेखील कोरोनाची लागण झाल्यामुळे कोणत्याही बंडखोर नगरसेवकाला अद्यापपर्यंत नोटीसदेखील बजावण्यात आलेली नाही. दरम्यान येत्या आठ दिवसांत संबंधित नगरसेवकांना नोटीसदेखील बजावण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. २७ बंडखोर नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप गटनेते भगत बालानी यांनी तब्बल तीस हजार पानांची कागदपत्रे विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहेत.
बंडखोर नगरसेवकांकडून ही भाजपचे नगरसेवक अपात्र ते बाबत प्रस्ताव सादर
भाजपच्या गटनेत्यांनी बंडखोर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर बंडखोर नगरसेवकांनी देखील भाजपच्या काही नगरसेवकांवर कारवाई करण्याबाबत १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत घरकूल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सादर केला आहे. येत्या महासभेत या प्रस्तावावर देखील चर्चा होणार आहे. यामध्ये भाजपचे गटनेते भगत बालानी, लता भोईटे, सदाशिवराव ढेकळे व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश असून, बंडखोर नगरसेवकांपैकी दत्तात्रय कोळी यांचा देखील समावेश आहे. येत्या महासभेत या प्रस्तावावरून देखील वाद विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे.