लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयातील फॉरेन्सिक (न्यायवैद्यक शास्त्र) विभागात पुरेशी यंत्रणा नसल्याने हा विभागच न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे विरोधाभासी चित्र निर्माण झाले आहे. महाविद्यालयात दीडशे विद्यार्थ्यांना परवानगी मिळाली असली तरी पदे मात्र, शंभर विद्यार्थ्यांनुसारच असल्याने ही एक अडचण समोर आली आहे.
न्यायवैद्यक शास्त्र हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारींच्या तपासामध्येही या विभागाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. शवविच्छेदनाचा अहवाल आणि त्याच्या बाबतीत तज्ज्ञांची मते लवकर समोर आल्यास कुठल्या घटनेचा तपास लवकर होण्यास मदत होत असते. मात्र, सद्य:स्थिती हा विभाग मनुष्यबळाच्या कमतरतेशी झगडत असल्याचे चित्र आहे. या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. वैभव सोनार यांच्याकडे सद्य:स्थिती महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद आहे. त्यानंतर सहयोगी प्राध्यापक डॉ. देवराज हे नियुक्त आहेत, तर नियमानुसार या विभागाचे सहायक प्राध्यापक हे पद रिक्तच आहे. एमडी, एमएस, उत्तीर्ण झालेल्या व वर्षभराच्या बंधपत्रावर जळगावात नियुक्ती मिळालेल्या डॉक्टरांमध्ये या विभागाच्या डॉक्टरांचाही समावेश होता, मात्र, ते रुजूच झाले नाही. त्यामुळे पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थती निर्माण झाली आहे. ज्ञानदानाव्यतिरिक्त अतिरिक्त पदभार या प्राध्यापंकाडे सोपविण्यात आला आहे. अचानक एकापेक्षा अधिक मृतदेह गंभीर घटनेचे आल्यास त्यावेळी एकापेक्षा अधिक तज्ज्ञ असणे व त्यांची मते समोर येणे महत्त्वाचे असते, मात्र, स्थानिक पातळीवर तशी यंत्रणाच नसल्याचे गंभीर चित्र आहे.
आकृतिबंध आणि अडचणी
महाविद्यालयत सुरू झाले तेव्हापासून शंभर विद्यार्थ्यांसाठी पदे होती. त्यानुसार आकृतिबंध होता, मात्र, त्यानंतर दीडशे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला एमसीआय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आताचे नॅशनल मेडिकल कौन्सिलकडून परवानगी मिळाली, मात्र, आकृतिबंध हा शंभर विद्यार्थ्यांप्रमाणेच असून, आता यासाठी शासनालाच नवीन पदे निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वच विभागात आता मनुष्यबळाचा मुद्दा समोर येणार आहे. नियमानुसार दीडशे विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक आणि एक सहायक प्राध्यापक अशी पदे हवीत, मात्र, अनेक विभागांत असे चित्र नाही.