अमृतसर एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अमृतसर एक्सप्रेस बंद असल्यामुळे, पंजाबमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच उन्हाळ्यात पंजाब प्रांतात फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचींही गैरसोय होत असून, रेल्वे प्रशासनाने पुन्हा ही गाडी सुरू करण्याची मागणी, नागरिकांमधुन केली जात आहे.
सुभाष चौकात वाहतूक कोंडी
जळगाव : सुभाष चौकापासून बेंडाळे चौकाकडे जाणाऱ्या भुयारी गटारीच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू असून, अधून-मधून वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. या कोंडीमुळे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. तरी मनपा प्रशासनाने तातडीने हे काम करण्याची मागणी होत आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय
जळगाव : कॉग्रेस भवनासमोर रस्त्यावर बेशिस्तपणे प्रवासी रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी नागरिकांना या ठिकाणाहून मार्ग काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी यामुळे अपघाताचींही शक्यता निर्माण झाली आहे. तरी वाहतूक विभागाने या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.
पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय
जळगाव : जिल्हा परिषदेकडून रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या रस्त्यावर रात्री अनेक ठिकाणी पथदिवे बंद राहत आहे. यामुळे स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे, सायंकाळी वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. तरी मनपा प्रशासनाने पादचारी नागरिकांच्या सोयीसाठी या रस्त्यावर सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.
जळगाव विभागाला नवीन विभाग नियंत्रकांची प्रतिक्षा
जळगाव : गेल्या आठवड्यात महामंडळाच्या जळगाव विभागातून राजेंद्र देवरे सेवानिवृत्त झाल्या नंतरही, अद्यापही महामंडळातर्फे जळगावसाठी नवीन विभाग नियंत्रकांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रशासकीय मान्यतांची कामे रखडत आहेत. सध्या विभाग नियत्रंक पदाचा पदभार मुख्य यांत्रिक अभियंता श्रावण सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.