जिजाबराव वाघ / ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 6 - पशुधन निरोगी राहण्यासह त्याची क्रयशक्ती वाढावी म्हणून वर्षातून दोन वेळा जनावरांचे लसीकरण केले जाते. लाळ्या - खुरकत हा विषाणूजन्य साथ आजार म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र एफएमडी लसच उपलब्ध नसल्याने चाळीसगाव तालुक्यातील एक लाख 14 हजार 620 पशुधन ‘राम भरोस’ असल्याचे वास्तव्य समोर आले आहे. पशुपालकांसमोर साथ रोगापासून जनावरांचा बचाव तरी कसा करायचा.? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.चाळीसगाव तालुक्याची ओळख राज्यभर ‘दुधगंगा’ अशी आहे. येथे शेतीव्यवसायाच्या जोडीला पशुपालनही केले जाते. अडचणीसह दुष्काळाच्या वणव्यात दूध व्यवसाय शेतकरी व पशुपालकांना उभारी देतो. यामुळे तालुक्यात मोठय़ा संख्येने पशुपालन केले जाते. ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला दूध संकलन करणा-या डेअरी व्यवस्थेने बळकटी आली आहे. गेल्या वर्षभरापासून पशुपालक चांगलेच धास्तावले असून लाळ्य़ा-खुरकत आजारापासून जनावरांना वाचविण्यासाठी दमछाक होत आहे. जनावरांच्या दवाखान्यात यासाठी देण्यात येणारी एफएमडी लस उपलब्ध नाही. लस केव्हा उपलब्ध होईल. याचे उत्तरही पशुधन विकास अधिका-यांकडे नसल्याने पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.
लाळ्य़ा-खुरकत आजार आणि जनावरेलाळ्य़ा-खुरकत हा विषाणूजन्य साथरोग आहे. यात जनावरांची क्रयशक्ति निम्म्याने कमी होऊन ते कायमस्वरुपी निकामी होते. तोंडात, स्तनांवर व्रण येणे, खुरांमध्ये जखमा होणे अशी आजाराची दृश्य लक्षणे असून दुध देणा-या जनावरांना याचा मोठा फटका बसतो. दूध देण्याची क्षमता खुंटते. परिणामी उत्पन्न कमी होते. त्यामुळे असे निकामी पशुधन शेतक-यांना विकावे लागते. रोगग्रस्त पशुधनाला विक्रीतही फारसा भाव मिळत नाही. यंदा शेतकरी आणि पशुपालकांची यामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. डोळ्यासमोर जीवाशिवाचे मैतर असणारी जनावरे व्याधीग्रस्त होत असल्याचे पाहून पशुपालक व्यथित होत आहे. सहा महिन्यात एकदा लसीकरण चाळीसगाव तालुक्यात एप्रिल 2017 मध्ये गायवर्गीय (गाय, बैल) 77 हजार 391 आणि म्हैस 25 हजार 609 असे एकूण एक लाख तीन हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले होते. यानंतर सप्टेंबर 2017 आणि मार्च 2018 मध्ये जनावरांना एफएमडी लस देणे अपेक्षित असताना गेल्या 11 महिन्यात लस उपलब्ध झाली नसल्याची कैफियत पशुपालकांनी मांडली आहे. पशुपालकांना एक रुपया शुल्क देऊन जनावरांना लसीकरण करुन घेण्याची सोय असते. खासगी औषधी विक्रेत्यांकडेही लस उपलब्ध नाही.
एक लाखाहून अधिक पशुधन ‘रामभरोस’लाळ्या - खुरकत साथरोगामुळे जनावरे दगावत नाही. मात्र कायमस्वरुपी निकामी होते. असे बिनकामी पशुधन पोसणे शेतकरी व पशुपालकांना शक्य होत नाही. एफएमडी लस राज्यभरात कुठेही उपलब्ध नसल्याने राज्यातील दोन कोटी मुकी जनावरे लसीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. चाळीसगाव तालुक्यातील गायवर्गीय 85 हजार 990 तर म्हैस 28 हजार 630 असे एकुण एक लाख 14 हजार 620 पशुधनाचाही यात समावेश आहे. एफएमडी लस तातडीने उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी तीव्र होत आहे.
लाळ्या - खुरकत आजारापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी वषार्तून दोन वेळा लसीकरण करण्यात येते. गेल्या 11 महिन्यात एफएमडी लस उपलब्ध होऊ शकली नाही. एप्रिल 2017 मध्ये तालुक्यातील 90 टक्के पशुधनाचे लसीकरण करण्यात आले होते.- डॉ. जे.आर. राठोड, पशुधनविकास अधिकारी (विस्तार) पं.स. चाळीसगाव.