जळगाव : खासगी आस्थापना, कारखाने याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे सांगितले असले तरी पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने याठिकाणीही अडचणी येत आहेत. खासगी प्रतिष्ठानमध्ये सीए संघटनेने लसीकरण शिबिर आयोजित करून संघटनेचे सदस्य व कुटुंबियांचे लसीकरण करून घेतले आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती व एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांना संरक्षण मिळावे, यासाठी त्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे सांगण्यात आले होते. यात सीए संघटनेने पुढाकार घेत लसीकरण करून घेतले आहे. मात्र, जळगावातील औद्योगिक वसाहतीचा विचार केला असता, जवळपास ३५ ते ४० हजार कर्मचारी, मजूर, कामगार याठिकाणी असून, या सर्वांचे लसीकरण करायचे झाल्यास लस उपलब्ध होत नसल्याचे समोर आले. अगोदर ४५ वर्षांवरील इतर आजार असलेल्या व्यक्ती व ६० वर्षांवरील व्यक्तींनाच लसीकरण केले जात होते. त्यानंतर ४५ वर्षांच्या पुढील प्रत्येक व्यक्तीला लसीकरणाची परवानगी मिळाली. मात्र, यात लसीकरणाची तयारी दर्शवली तरी पुरेशी लस मिळत नसल्याने अडथळे येत आहेत.
औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या लसीकरणासाठी या परिसरात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.