लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अयोध्यानगरातील एका कुटुंबातील कोरोना बाधित महिला थेट मॉर्निंग वॉकला तर मुले फॅक्टरीत गेल्याचा धक्कादायक प्रकार केंद्रीय समिती तसेच महापालिकेच्या पथकाच्या पाहणीत समोर आला. संबधितांवर औद्योगिक वसाहत पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.
अयोध्यानगरातील एकाच कुटुंबातील ७ जण बाधित होते. यात वृद्ध , त्यांचा मुलगा- सून, दीड वर्षाचा मुलगा, अन्य दोन मुले यासह एक गर्भवती महिला असे आधिच बाधित होते. या कुटुंबाला पथकाने भेट दिल्यानंतर यात बाधित महिला ही थेट मॉर्निंग वॉकला गेल्याचे समोर आले. यानंतर या कुटुंबाने विठ्ठल पेठेतून बाधित महिलेला या घरी हलविल्याचेही समोर आले. कुटुंबाने घरात कोण कोण बाधित आहे ही माहिती लपविली शिवाय होम आयसोलेशनची परवानगी घेऊनही त्याचे नियम न पाळता बाहेर फिरले, मुले फॅक्टरीत गेली असा गंभीर प्रकार समोर आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे डॉ. रावलानी यांनी सांगितले.
होम आयसोलेशनच्या रुग्णांकडून संसर्ग
होम आयसोलेशनमधील रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्याची मध्यंतरी बोलले जात होते. त्यावर या प्रकाराने शिक्कामोर्तब झाले आहे. कोरोना वाढीमागे या रुग्णांची बेफिकीरी हेही एक कारण सांगितले जात होते. एका ठिकाणी पाहणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.