किरण चौधरीरावेर : कोरोनाच्या महामारीतील लॉकडाऊनपासून ते अनलॉकच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील रावेर तालुक्यातील ५१ हजार ८२१ कार्डधारक असलेल्या २ लाख २४ हजार ४२५ लाभार्थीना गहू, तांदूळ व चणा डाळीचा पुरवठा आता शासनाकडून थोपवण्यात येणार असल्याने हातावर पोट असणाऱ्या हातमजुरांना भाकरीचा चंद्र शोधण्याची चिंता भेडसावत आहे. कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून ते नोव्हेंबर दरम्यानच्या नऊ महिन्यांत लॉकडाऊन व अनलॉकचे टप्प्याटप्प्याने झालेल्या मार्गाक्रमणात सर्व उद्योग, व्यापार व व्यवसाय ठप्प झाले. तथा कालांतराने उघडत असल्याने गरजू व गरीब अशा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांना केंद्र व राज्य सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थीना तर अंत्योदय योजनेंतर्गत प्रतिकार्डधारकांना ३५ किलो धान्य मोफत वितरीत करण्याचा मोठा दिलासा दिला होता.रावेर तालुक्यातील ५१ हजार ८२१ कार्डधारक असलेल्या २ लाख २४ हजार ४२५ लाभार्थीना तर जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील १ लाख ३७ हजार ७४९ कार्डधारक तर प्राधान्य कुटुंब योजनेतील २२ लाख ६३ हजार ५५ अशा एकूण अंदाजे ३२ लाख २७ हजार लाभार्थीना तब्बल ८७ हजार २५० मेट्रिक टन धान्याचे मोफत वितरण करण्यात आले. मार्च महिन्याचे वितरण एप्रिलमध्ये झाल्याने नोव्हेंबर महिन्याचे मोफत नियतनाचे अद्यापही वितरण सुरू आहे. त्यात २९ हजार ८०० मेट्रिक टन गहू, ५७ हजार ६०० मेट्रिक टन तांदूळ तर दोन ते तीन नियतनात उपलब्ध झालेली ८५० मेट्रिक टन तूरडाळ वितरीत करण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या शेतमजूर व हातमजुरांची चिंता मिटली होती. गत नऊ महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या या आधारामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उदरनिर्वाह चालवणे कोरोनाच्या संकटातही सुकर झाले होते. आता मात्र नऊ महिन्यांपासून मिळणारा आधार अचानक थांबणार असल्याने रोजंदारीचा प्रश्न आवासून असल्याने चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे नऊ महिन्यांत मायबाप सरकारने ३५ किलो धान्य मोफत देण्याचा दिलेला मदतीचा हात भाकरीचा चंद्र शोधण्याची चिंता मिटवणारा ठरला होता. गहू, तांदूळ व तूरडाळीमुळे निम्मे बोझा हलका होत असल्याने तिखट, मीठ, तेल अन् भाजीची चिंता असायची. अधूनमधून मिळणाऱ्या शेतमजुरीच्या कामांवर उर्वरित तिखट, मीठ, तेल अन् भाजीची व्यवस्था करून घेता येत होती. मात्र आता हा मदतीचा हात थांबणार असल्याने व रब्बी हंगामात शेतमजुरांना लागणार्या शेतीकामाच्या ओहोटीमुळे रोजंदारीचा मोठा प्रश्न भेडसावणारा असून मोफत धान्याऐवजी वाढता भार पडणार असल्याने जीवनाचा रहाटगाडा ओढण्याचे संकट आवासून राहणार आहे. - पंडित रामचंद्र चौधरी, शेतमजूर, खानापूर, ता.रावेर
पतीच्या अकाली निधनानंतर मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न व वृद्ध सासू सासर्यांचे संगोपन करण्याचे शिवधनुष्य पेलायचे आव्हान क्रूर नियतीने उभे केले असताना कोरोनाच्या महामारीचे संकट दुष्काळात तेरावा महिना म्हणून उभे राहिले. दरम्यान, मायबाप सरकारने हाताला काम नसताना मोफत धान्य देवून कुटुंबाचा गाडा हाकलण्यासाठी मदतीचा हात दिल्याने गरीब व गरजू कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला. मात्र, या महिन्यापासून सरकारने मोफत धान्य वितरण थांबवण्याचा दंडुका उगारल्याने व रब्बी हंगामातील हातमजुरीचे कामे रोडावल्याने हा कुटुंबाचा रहाटगाडा हाकण्याचे मोठे संकट आवासून आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी हातमजूरीसाठी भटकंती करण्याचा यक्षप्रश्न आहे. -सविताबाई चौधरी, शेतमजूर, खानापूर, ता.रावेर.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत आपल्या नियमीत अंत्योदय व प्राधान्य कुटुब योजनेतील लाभार्थीना मार्च ते नोव्हेंबर महिन्यात मोफत धान्याचे नियतन सुरळीत व सुकरपणे पार पडले. आता डिसेंबरपासून नियमित नियतन पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. अंत्योदय योजनेप्रमाणेच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थीनाही दिवाळीच्या सणानिमित्त साखरेचे वितरण करण्यात आले. -हर्षल पाटील, तालुका पुरवठा निरीक्षक, रावेर