रिॲलिटी चेक
विजयकुमार सैतवाल
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांपासून सुटका मिळण्यासाठी सर्वांनाच अनलॉक हवे आहे, मात्र असे असले तरी नियमांचे पालन करणे सर्वांची जबाबदारी नाही का, असा प्रश्न शहरातील परिस्थिती पाहून उपस्थित होत आहे. अजून अनलॉक झालेले नसताना शहरातील अनेक भागात नागरिक विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. अनेकांच्या तोंडावरील मास्क गायब असल्याचे तर काहींचे केवळ हनुवटीवर असल्याचे दिसून आले. शहरातील वेगवेगळ्या चौकात पाहणी केली असता, दीड तासात २३५ जण विनामास्क असल्याचे आढळून आले.
कोरोना संसर्गामुळे असलेले निर्बंध शिथिल करून सर्वत्र अनलॉक होण्याच्या हालचाली सुरू आहेत. याविषयी आरोग्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वेगवेगळ्या चौकात पाहणी केली असता, अनलॉक झालेले नसताना व निर्बंधाविषयी निर्देश दिलेले असतानाही नागरिक किती बिनधास्त फिरत आहेत, त्यांच्या विनामास्क फिरण्यावरून दिसून आले. या संदर्भात शहरातील सहा प्रमुख चौकांमध्ये काही वेळ थांबून पाहणी केली. त्यावेळी पुरुष असो की महिला असो तसेच आबालवृद्धही विनामास्क फिरताना आढळून आले.
कारवाई करणारेच विनामास्क
कोरोना निवारणासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. निर्बंधांच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस प्रशासन व महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. असे असताना आता शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कोठेही कारवाई होताना दिसून येत नाही. इतकेच नव्हे कारवाई करण्याची जबाबदारी असलेले पोलीस कर्मचारीदेखील विनामास्क असल्याचे दिसून आले. या कर्मचाऱ्याने मास्क तोंडावर न लावता तो हनुवटीवर असल्याचे दिसून आले.
वेगवेगळ्या चौकात आलेले अनुभव
आकाशवाणी चौक -
आकाशवाणी चौकामध्ये दुपारी साडेबारा वाजता १० मिनिटे थांबून पाहणी केली असता या काळात २५ जण विनामास्क ये-जा करताना आढळून आले. यात दुचाकीस्वार असो की रिक्षात जाणारे असो, त्यातील अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. यात काही जणांना विचारले असता दम लागत असल्याचे काहींनी सांगितले.
स्वातंत्र्य चौक -
स्वातंत्र्य चौकात दुपारी १२.४५ वाजेपासून १५ मिनिटे थांबून पाहणी केली असता तेथेदेखील अनेक वाहनधारक, पादचारी विनामास्क असल्याचे आढळून आले. १५ मिनिटांत तब्बल ४० जण विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले.
कोर्ट चौक
कोर्ट चौकात दुपारी १.०५ वाजेपासून १५ मिनिटे थांबून पाहणी केली असता, तेथेदेखील अनेक जण विनामास्क असल्याचे आढळून आले. १५ मिनिटांत तब्बल ४५ जण विनामास्कचे आढळून आले.
नेहरू चौक
रेल्वे स्थानक, शहरातील मध्यवर्ती व बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नेहरू चौकात दुपारी दीड वाजता थांबून पाहणी केली. तेथे १० मिनिटांत ३५ जण विनामास्क असणारे वाहनधारक, पादचारी आढळून आले.
टॉवर चौक
दुपारी १.४५ वाजता टॉवर चौकात पाहणी केली असता, तेथेदेखील अनेक जण विनामास्क आढळून आले. येथेदेखील १० मिनिटांत ३० जण विनामास्क फिरताना आढळून आले.
शिरसोली रोड
शिरसोली रस्त्यावरील शिरसोली नाक्यावर संध्याकाळी पाच वाजता पाहणी केली असता तेथे १५ मिनिटांत तब्बल ७० जण विनामास्क फिरताना आढळून आले. या भागात अधिक गर्दी असली तरी त्या ठिकाणी निष्काळजीपणा अधिक दिसून आला.