लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : वादळ, आग आणि मुसळधार पाऊस, पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून जनतेचा बचाव करण्यासाठी व मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी १ जूनपासून तहसील कार्यालयात ‘वॉर रूम’ सुरू करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.
प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी अमळनेर व चोपडा तालुक्यांतील पोलीस, महसूल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, गटविकास अधिकारी, निम्न तापी प्रकल्प अधिकारी यांची मान्सूनपूर्व बैठक घेतली. यात आराखडा तयार करणे, सूक्ष्म नियोजन करणे, नदी नाल्यांची माहिती, नदीकाठच्या गावांची माहिती गोळा करणे, याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागात ग्रामीण ग्राम समित्या स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बचाव पथक, पोहणारे, डॉक्टर, स्वयंसेवक अधिकारी यांच्यात आपसात संवाद असला पाहिजे व वादळ, पूर, पाणी सोडणे याबाबतची पूर्व माहिती, सूचना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असेही सांगण्यात आले.
पूरनियंत्रण रेषेच्या आतील अतिक्रमण तत्काळ काढावेत, वीज मंडळाने वीज तारांवरील फांद्या काढाव्यात, पालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावाव्यात, संदेश वहन यंत्रणा निर्दोष ठेवावी, असेही सांगण्यात आले. बैठकीस अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व चोपडा अमळनेर विभागातील अधिकारी हजर होते.