जळगाव : खुला भुखंड कराच्या वसुलीत सुसूत्रता यावी आणि वसुली प्रभावीपणे व्हावी, यासाठी मनपाचे खुला भुखंड विभागाचे प्रभाग समितीतंर्गत नुकतेच विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रभाग समितींकडून मालमत्ता करासोबत खुल्या भुखंडांच्या कराची वसुली देखील केली जाणार आहे.
जळगाव शहरात सुमारे सतरा हजार खुले भुखंड आहेत़ त्या भुखंड धारकांकडून भुखंडकर वसूल करण्यात येत असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून खुला भुखंड कराच्या वसूलीत सुसूत्रता नव्हती व वसुली मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत नव्हती. अखेर महानगरपालिका महसूल उपायुक्त प्रशांत पाटील यांनी १४ जून रोजी मनपाचे खुला भुखंड विभागाचे प्रभाग समिती अंतर्गत विलीकरण करण्याबाबत आदेश काढले आहे. आदेशानुसार खुला भुखंड विभागातील कार्यरत असलेले कर्मचा-यांची सेवा ही आता प्रभाग समिती कार्यालयांकडे तात्पपुरत्या स्वरूपात वर्ग करण्यात आली आहे. मंगळवार पासून प्रभाग समिती कार्यालयांनी खुला भुखंड कराची वसुलीला सुरूवात केली आहे.
ऑनलाइन भरणासाठी प्रयत्न
महानगरपालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा जळगावकरांना उपलब्ध करून दिली आहे़ परिणामी, जळगावकरांना घर बसल्या मालमत्ता कराची रक्कम ऑनलाइन भरता येते. याचप्रमाणे खुला भुखंड कर ऑनलाइन भरता यावा यासाठी मनपाने आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.