जळगाव : शिवाजी नगरात कानळदा रस्त्यावर असलेल्या योगेश्वर टिंबर या लाकडाच्या वखारीला बुधवारी रात्री १२ वाजता अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या वखारीत लाकूड, फर्निचर तसेच लाकडाचे इतर साहित्य होते. शॉर्ट सर्किट होऊन हळूहळू अचानक धूर निघाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क केला. शिवाजी नगरातील बंब आणून आग विझविण्यात आली. अग्निशमन दलाचे कर्मचारी सुरेश वाणी, मदन दराळे, बाळू पोळ व नामदेव पोळ यांच्यासह नागरिकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवली. दरम्यान, या आगीत नुकसानीचा नेमका आकडा कळू शकला नाही. मात्र मोठ्या प्रमाणात लाकूड व फर्निचर जळून खाक झाल्याची माहिती वखारीचे मालक दिनेश पटेल यांनी ‘लोकमत’ला दिली. घटना वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.
जळगावमधील शिवाजी नगरातील वखारीला आग; फर्निचर, लाकूड जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:44 AM