जळगाव - जिल्ह्यात आगामी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मंगळवार व बुधवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरणीला वेग आला असून, सोमवारी चोपडा, जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती.
अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा
जळगाव - शहरातील नेरी नाका चौकात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करून, याठिकाणी पूर्णाकृती बसविण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) तर्फे करण्यात आली आहे. तसेच मनपा बांधकाम विभागाच्या अंतर्गत या पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभिकरण देखील करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची पाठ
जळगाव - तब्बल दीड महिने उशिराने सुरू करण्यात आलेल्या भरडधान्य शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शासकीय बाजारभावापेक्षा खासगी बाजारातदेखील चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आता शासकीय खरेदी केंद्रापेक्षा खासगी व्यापाऱ्यांकडे माल विक्री पसंत केले आहे. लवकर खरेदी सुरू झाली असती तर कदाचित याठिकाणी शेतकऱ्यांनी माल विक्री केला असता.
गुंठेवारीसाठी मागविले प्रस्ताव
जळगाव - शहरातील गावठाण भागातील ले आऊटला मंजुरी न मिळाल्याने गुंठेवारीतील रहिवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने मुदतवाढ मिळालेल्या भूखंडधारकांसाठी मार्च २०२२ पर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आहे. शहरातील इंजिनिअर व आर्किटेक्टमार्फत प्रस्ताव सादर करून नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. अन्यथा मुदतीनंतर त्या भागातील सर्व सेवा बंद करून अतिक्रमण विभागामार्फत बांधकामे निष्कासित करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.