नेमेची येतो मग पावसाळा...हे माहित असूनही मान्सूनपूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या गोष्टी केवळ बैठका, इतिवृत्त आणि अहवालापुरती मर्यादित राहिल्या आहेत, हे पहिल्याच पावसाने सिध्द केले आहे. संपूर्ण खान्देशात पावसाने जी दाणादाण उडवली, त्यावरुन प्रशासकीय यंत्रणेच्या पूर्वतयारीचे बिंग फुटले आहे. धुळ्यानजिक असलेल्या वरखेडी गावात चिंचेचे जुने झाड कोसळून तीन बालकांसह आईचा मृत्यू झाला. रात्री साडेआठ वाजेच्या या घटनेनंतर मदतकार्याला तब्बल तीन तासानंतर सुरुवात झाली. यावरुन प्रशासकीय यंत्रणा किती सज्ज आहे, हे दिसून येते. शनिवारी जळगाव शहरात पाऊस पडला, सखल भागात पाणी साचलेले होते. पण महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने रविवारी ‘सुटी’चा आनंद घेतला. कक्षाला कुलूप लावून अधिकारी आणि कर्मचारी निवांत होते.या दोन्ही घटना जिल्हा मुख्यालयाच्याठिकाणी वा त्या नजिक घडल्या आहेत. सगळे वर्ग एकचे अधिकारी याठिकाणी असताना एवढी बेफिकीरी असेल तर गावपातळीवर काय अवस्था असेल याची कल्पना केलेली बरी. संपूर्ण खान्देशात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु तीन दिवसांनंतरही पंचनामे केले गेलेले नाहीत. वादळ, पाऊस, वीज कोसळणे यासंबंधी अंदाज वर्तविणारी उपकरणे बसविल्याचा दावा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा करीत असते. पण या उपकरणांचा कोणताही फायदा शेतकरी वा सामान्य नागरिकाला होत नाही. उपकरणे असतील तर ती कार्यान्वीत आहेत काय, नादुरुस्त असतील तर त्याची दुरुस्ती कुणी करायची यासंबंधी आढावा बैठकांमध्ये चर्चा होते काय? नालेसफाई हा गाव आणि शहरांमधील जिव्हाळ्याचा विषय आहे. नदीकाठी असलेली अतिक्रमणे आणि जीर्ण इमारतींना नोटीसा हा दरवर्षीचा नैमित्तिक उपचार आहे; तो गांभीर्याने घेतला जात नाही. मानवी वस्तींमध्ये पाणी शिरले, जुनी इमारत कोसळली आणि त्यातून जीवित वा वित्त हानी झाली की, प्रशासनाचे डोळे खाडकन उघडतात. वेगवेगळ्या शासकीय विभागांमध्ये मग जबाबदारी कुणाची हा ढकलाढकलीचा लोकप्रिय कार्यक्रम सुरु होतो. दोषींवर कारवाईचे इशारे दिले जातात. ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे पुढील दुर्घटना होईपर्यंत याविषयात काहीही होत नाही. शेंदुर्णीसारख्या गावात दीड दिवस वीजपुरवठा खंडित होता. अनेक ठिकाणी तासन्तास वीज गायब होती. पहिल्याच पावसात हे हाल असतील तर संपूर्ण चार महिन्यात काय होईल. तीच गत पाणीपुरवठा योजनांची होती. वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा लांबण्याचे समीकरण झाले आहे. वीज तारांना अडथळा आणणाऱ्या फांद्या तोडायच्या आणि त्या तशाच पडू द्यायच्या, एवढाच वीज कंपनीचा मान्सूनपूर्व कामांचा आराखडा असतो. एकंदर यंत्रणेची देखभाल दुरुस्ती वीज कंपनी आणि स्थानिक स्वराज्य संस्था करीत नाही, त्यामुळे वीज आणि पाण्यावाचून नागरिकांचे हाल निश्चितपणे होतात. राहता राहिला आरोग्य विभाग. पावसाळ्यापूर्वी सर्व आरोग्य केंद्रे, रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांची कायमस्वरुपी उपलब्धता असावी अशी काळजी घेणे अपेक्षित असताना तेथेही हीच बोंब आहे.-मिलींद कुलकर्णी
वा रे आपत्ती व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 2:20 PM