जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजपाला एकदाच संधी द्या. आम्ही एक वर्षात शहराचा विकास करुन दाखवू. जर एका वर्षात कामे नाही झाली तर विधानसभेत मते मागणार नाही, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांंनी ‘लोकमत’ शी मांडली.महापालिका निवडणुकीत भाजपाच्या सर्व निर्णयांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभविणारे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याशी ‘लोकमत’ ने बातचित केली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली. ती त्यांच्याच शब्दात....प्रश्न - केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता तसेच खासदार, आमदारही भाजपाचे असताना शहराचा विकास का झाला नाही?महाजन- आम्ही २५ कोटींचा निधी शहराच्या विकासासाठी आणला होता परंतु मनपातील सत्ताधाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे हा निधी खर्च होवू शकला नाही. यामुळेच आम्ही पूर्ण बहुमत मागतो आहे. महापौरही आमचा द्या.. म्हणजे विकास करायला काहीही अडचण येणार नाही. सरकरच्या मदतीने मनपावरील कर्जही फेडू तसेच दोन महिन्यातच विकास कामांसाठी २०० कोटीचा निधीही मिळवू. शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे.प्रश्न- हुडकोचे कर्ज, गाळेप्रश्न, समांतर रस्ते व महामार्गाचे चौपदरीकरण यात कुणीही अडकाठी आलेली नसताना हे प्रश्न का मार्गी लागू शकले नाही?महाजन- गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिनियमात बदल करण्यात आला आहे, याचा लाभ गाळेधारकांना नक्कीच मिळेल. महामार्गाचे चौपदरीकरण, समांतर रस्ते, हुडको कर्जाचा प्रश्न नक्की सोडविणार. माझ्या शब्दावर जनतेने विश्वास ठेवावा.. कामे नाही केली तर मग मला बोला. मी सांगतो आहे, भाजपाला एकदा संंधी देवून पहा १ वर्षात जळगावचा चेहरा मोहरा बदलून टाकेन.प्रश्न- खाविआने विकास केला नाही असे आपण म्हणतात आणि सुरुवातीला त्यांच्यासोबतच युतीचे पाऊल का उचलले? युती का हावू शकली नाही?महाजन- सुरेशदादा जैन यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने युतीची तयारी आम्ही केली होती. त्याबाबत बोलणीही झाली. मात्र आम्हाला केवळ २८ जागा देवू केल्या. त्या पुरेशा नव्हत्या. भाजपा हा केंद्रात व राज्यात सत्ताधारी पक्ष असल्याने तसेच आमच्याकडे भरपूर उमेदवार असल्याने एवढ्या कमी जागांवर निवडणूक लढविणे शक्य नव्हते. गतवेळी आम्ही १५ जागा जिंकल्या असल्या तरी आता भाजपाची ताकद वाढली आहे.राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे या निवडणुकीत काहीच अस्तित्व राहणार नाही, हे चित्र स्पष्ट आहे. भाजपा व शिवसेना हे दोन्हीच पक्ष प्रबळ असल्याने सामना यांच्यातच आहे.प्रश्न- आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा काय आहे?महाजन- प्रचारात विरोधकांवर आरोप करुन लोकांचे मनोरंजन आम्हाला करायचे नाही. आमचा फक्त शहराच्या विकासावर भर असून विकास कामे करण्यासाठी आम्ही जनतेला संधी मागत आहोत. भाजपाची भूमिका मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. स्थानिक पातळीवर अनेक कामेही आम्ही केली आहेतच. शहरासाठी मेडीकल हब आणले आहे. देशात अशाप्रकारे हे पहिले मेडिकल हब आहे. पुढे एमआयडीसीचा विकास करुन बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यावरही भर राहणार आहे.प्रश्न- भाजपाला उमेदवार आयात करण्याची गरज का पडली?महाजन- भाजपासाठी अनुकूल वातावरण असल्याने अनेक लोक आमच्या संपर्कात होते आणि बेरजेचे राजकारण करताना येणाºयांना रोखता येत नाही. हे करताना मात्र पक्षातील बहुसंख्य निष्ठावंतांनाही उमेदवारी देण्यात आल्या आहेत. ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता नाही, अशा कार्यकर्त्यांनाच उमेदवारी नाकारली आहे.सर्व ७५ जागांवर चांगले उमेदवार दिले असून जनतेचाही भाजपच्याबाजूनेच कल वाढत चालला आहे. यामुळे निश्चित भाजपाला आश्चर्यकारक यश मिळणार आहे.गेल्या १५ वर्षांत दुर्लक्ष झाल्याने शहराची दयनीय अवस्था !गेल्या १५ वर्षात खान्देश विकास आघाडीने काहीच कामे न केल्याने शहराची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील रस्ते, स्वच्छता, दिवे आदी मुलभूत प्रश्नही सुटू शकलेले नाही. मनपावर हुडको व इतर कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे कर्ज फेडण्यातच पैसे खर्च होत आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाच योग्य पर्याय आहे. नागरिकांनी भाजपाला संधी द्यावी.भाजपा ५० पेक्षा जास्त जागांवर विजय नक्कीच मिळविणार...केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शहराचा विकास करण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही, हे जनतेला माहित आहे, त्यामुळे जनतेचा कल भाजपाकडे असून आम्ही ५० पेक्षा अधिक जागा नक्कीच जिंकू, असा आत्मविश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तर काँग्रेस-राष्टÑवादी खातेही उघडणार नाही असे मत व्यक्त करून नाशिक मनपात ज्या पद्धतीने भाजपाला मोठे यश मिळाले तसेच चित्र जळगावातही दिसेल, असा आशावाद व्यक्त केला.
वर्षभरात विकास केला नाही तर विधानसभेत मते मागणार नाही - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:14 PM
शहराच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा विशेष निधी आणणार
ठळक मुद्देशहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहेगाळेधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिनियमात बदल