जळगाव : दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे व्हावी, यासाठी जनजागृती व कामे वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना पत्र दिले असून ते जिल्ह्यातील सरपंचांना देण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. पाटील यांनी दिली. या पत्राचे ग्रामसभेत वाचन करण्यात येणार असून श्रमदानातून जलसंवर्धनाची कामे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जलपातळी घटत जावून दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने श्रमदानातून जलसंधारणाची कामे वाढावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचांना पत्र दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातही पंतप्रधानांच्या संदेशाचे पत्र आले असून ते जिल्ह्यातील जवळपास सर्वच सरपंचांना पोहचविण्यात आले आहे. हे पत्र ग्रामसभेत ग्रामस्थांसमोर वाचन करावे, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर बैठक घेण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत.जमिनीत अधिकाधिक पाणी साठविणे, जलसंधारणाची कामे करणे, वृक्षारोपणावर अधिक भर देणे, या सर्व बाबीत लोकसहभाग वाढल्यानंतरच दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे़ यासाठी गावागावात, शाळांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे वरिष्ठ पातळीवरून आदेश आहे़ त्यानुसार पंतप्रधानांनी सर्वांना उद्देशून लिहिले पत्र ग्रामसभेत वाचण्याचा सूचना आहेत़ या पत्राच्या कलर प्रिंट सर्व गटविकास अधिकाºयांना वाटप करण्यात आल्या़ त्यानंतर स्थानिक पातळीवर सरपंच व ग्रामसेवकांच्या बैठकी घेऊन त्यांना सूचना द्याव्यात व २२ जूनपर्यंत ग्रामसभा घेऊन या पत्राचे वाचन करावे व कामांवर भर द्यावा, अशा सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहे़ ३० जूनपर्यंत या ग्रामसभांचे छायाचित्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्याचे आदेशही आहेत़
लोकसहभागातून होणार गावागावात जलसंधारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:47 AM