ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.9 - मनपा स्थायी समितीच्या सभेत अजेंडय़ावरील विषय घेण्यापूर्वी शहरातील सध्या उद्भवलेल्या पाणीसमस्येवर चर्चा करा, अशी मागणी करीत भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात सभापतींच्या आसनासमोर जमिनीवर ठिय्या देत सत्ताधा:यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. मात्र अजेंडय़ावरील विषयांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे ते विषय संपल्यावर या विषयावर बोला, असे सभापतींनी सांगत अजेंडय़ावरील विषय मंजूर करीत सभा गुंडाळली.
शहरात गेल्या 3 तारखेपासून वाघूर पाणी योजनेचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणीपुरवठय़ात व्यत्यय आला असून नागरिकांचे हाल सुरू आहेत. गुरूवार पासून पाणीपुरवठा सुरू झाला असला तरीही अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळण्यास अजून एक-दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. या गंभीर विषयावर स्थायी समितीच्या विषयांवर चर्चा होण्याआधीच चर्चा व्हावी अशी मागणी सभा सुरू झाल्यानंतर व विषय पत्रिकेवरील (अजेंडा) इतिवृत्ताचा विषय मंजूर झाल्यानंतर सभागृहात आलेल्या भाजपा सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. त्यावर सभापतींनी स्थायी समिती सभेत प्रश्नोत्तराचा तास नसतो. त्यामुळे अजेंडय़ावरील विषय झाले की नंतर चर्चा करा, असे सांगितले. मात्र सोनवणे यांनी पाण्याचा विषय गंभीर आहे. आधी त्यावर चर्चा करा, अशी मागणी केली. मात्र सभापतींनी ती फेटाळल्याने भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे, उज्जवला बेंडाळे व नवनाथ दारकुंडे यांनी सभागृहात सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत ठिय्या मारत घोषणाबाजी सुरू केली. सुरूवातीला खाविआचा धिक्कार असो, सत्ताधा:यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मनसे व राष्ट्रवादी देखील सत्ताधा:यांसोबत असल्याने सर्व सत्ताधा:यांचा निषेध असो, अशा घोषणाही देण्यात आल्या. घोषणा सुरू असतानाच सभापतींनी नगरसचिवांना अजेंडय़ावरील विषय वाचण्याची सूचना केली. त्यामुळे घोषणाबाजीतच अजेंडय़ावरील सर्व विषयांचे वाचन करून ते मंजूर करण्यात आले.