लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल न भरल्याने योजनेची वीजजोडणी महावितरणकडून तोडण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील रायपूरमध्ये पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. पाणी असून सुद्धा कृत्रिम पाणी टंचाईचा ग्रामस्थांना सामना करावा लागणार असल्याने आता यामुळे अखेर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा काही सदस्यांनीच दिला आहे.
सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंचांनी वीज बिलाचा भरणा वेळेवर केलेला नाही. त्यामुळे हे कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यात ग्रामसेवक शरद सूर्यवंशी हे आठवड्यातून केवळ एकच दिवस गावात हजेरी लावत असल्याने त्याचाही परिणाम होत आहे. गावातील समस्यांचा निपटारा होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरा सरपंच देण्यासाठी सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. दरम्यान, पाणी समस्येसंदर्भात उपसरपंच पुष्पाबाई परदेशी, सदस्य शीतल परदेशी, प्रवीण परदेशी, उषाबाई परदेशी, संगीता इंगळे यांनी निवेदन दिले आहे.