बोदवड : शहराला पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली आहे की काय, अशी स्थिती असून, आज रोजी शहरात पाणीपुरवठा होऊन काही प्रभागांत १७ ते २० दिवस उलटले आहेत, परंतु पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे भाजपने नगर पंचायतीवर मोर्चा नेत पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले.
बोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांसाठी जीवनदायी असलेली ओडिएच्या पाणीपुरवठा योजनेचा पूर्णा नदीला पूर आल्याने तसेच हतनूर धरणाचे पाणी सोडल्याने नदीत गाळ आहे. त्यामुळे ओडिएच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंगवरून पाणी उचल करणे १२ जुलैपासून बंद आहे.
सध्या विहिरीवरून होतो पाणीपुरवठा
बोदवड शहरातील नगरपंचायतच्या मालकीच्या असलेल्या विहिरीत पावसाचे पाणी आल्याने पाणी गोळा करून त्याची उचल करून शहराची तहान थेंबे थेंबे मिटवली जात आहे. शहरातील विहिरीत फक्त दोन दिवसांत दोन व्हॉल्व सुटतील इतके पाणी गोळा होते, असे एकूण पूर्ण शहरात नव्वद व्हॉल्व आहेत. त्यामुळे जर शहरातील विहिरीच्या भरवशावर पाणीपुरवठा केल्यास एका व्हॉल्वला पुन्हा पाणी येण्यास किमान दीड ते दोन महिने लागतील अशी स्थिती आहे.
अनेक वर्षांपासून प्रश्न कायम
गेल्या पाच वर्षांत शहरात सर्वात महत्त्वाच्या असलेला पाणी मुद्द्यावर नगर पंचायतने ठोस काहीच योजना मार्गी लावली नसल्याने ही पाणी टंचाई सोसावी लागत आहे, त्यात दोन दिवसांपूर्वी शहरात पाणीपुरवठा मंत्री यांनीसुद्धा आढावा बैठक घेतली, पण शहरातील एकानेही पाणी टंचाईवर काहीच मागणी केली नाही, नेहमी हीच स्थिती असल्याने शहरातील महिला व पुरुषवर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
याबाबत शहरातील भारतीय जनता पार्टीने पाणी टंचाईवर तहसील कार्यलयावर मोर्चा काढत नायब तहसीलदार यांना निवेदन देत पाणी टंचाईची कैफियत मांडली असून निवेदनावर भाजपचे तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, नरेश आहुजा, अमोल देशमुख, धनराज सुतार, रोहित अग्रवाल, दिलीप घुले, राजेंद्र डापसे, डॉ. ब्रिजलाल जैन, संतोष बारी, कृष्णा जाधव, सचिन जैस्वाल, मयूर शर्मा आदींनी निवेदन दिले.