लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी गूळ मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. गूळचे पाणी रविवारी दुपारी तापीच्या धावडा डोहापर्यंत पोहोचले आहे. यामुळे आता मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे पाण्याची समस्या दूर झाली आहे. गूळ प्रकल्पाच्या जलसाठ्यात धरणगाव पाणीपुरवठा योजनेचे आरक्षण आहे. येथून दोन आवर्तन शहराला मिळतात. अजून एक आवर्तन सुरक्षित असल्यामुळे धरणगावकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यातील भटकंती टळणार असल्याचा आशावाद नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी बोलून दाखविला.
धरणगाव शहराला तापीच्या धावडा डोहातून पाणीपुरवठा होत असतो. मार्चपर्यंत या डोहातील पाणी पुरते. मात्र, यानंतर पात्र कोरडे पडल्याने पाणीपुरवठा ठप्प होत असतो. परिणामी, गूळ मध्यम प्रकल्पावर धरणगावसाठी दोन आवर्तन राखीव करण्यात आले आहे. गूळ प्रकल्पातून नदीच्या पात्राद्वारे हे पाणी धावडा डोहापर्यंत येत असते. हा डोह भरला, म्हणजे महिनाभर धरणगाव शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत असतो.
अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा अंजनीतूनही शहरासाठी एक आवर्तन मिळाल्यामुळे गूळचे आवर्तन उशिरा घेतल्याचे नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी सांगितले. धावडा येथील पाइपलाइनमधून गाळ काढण्यात आल्यामुळे, आता एप्रिल आणि मेच्या रणरणत्या उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कोणतीच अडचण येणार नसल्याचे सांगून, आज डोहात आलेले पाणी महिनाभर पुरवणार असल्यामुळे पुढचे आवर्तन आता मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात घ्यावे लागले. हे पाणी महिनाभर पुरेल. परिणामी, जूनमध्ये पावसाळा लांबला, तरी १५ जूनपर्यंत धरणगावकरांना त्यांच्या हक्काचे पाणी पुरवणार असल्याचे नीलेश चौधरी यांनी सांगितले.
नागरिकांची निकड भागू शकेल, एवढंच पाणी जूनपर्यंत मिळणार आहे. पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू नये, यासाठी गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन व सर्व नगरसेवक, पाणीपुरवठा कर्मचारी परिश्रम घेत आहे. वैयक्तिक माझे २४ तास या संपूर्ण यंत्रणेवर लक्ष आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केले आहे.