लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढलेली असली तरी यामध्ये आणखी भर पडावी, यासाठी जिल्ह्यात भूजल साक्षरता अभियान राबविण्यात येत असून त्या माध्यमातून जल पुनर्भरणाविषयी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली जात आहे. यामध्ये साडेतीन हजार नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून वर्षातून चारवेळा जिल्ह्यातील भूजल पातळीची मोजणी केली जाते. यामध्ये पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांपासून वाढ झाल्याचे आढळून आले. यात आणखी वाढ होण्यासाठी ३० जूनपासून भूजल साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.
विंधन विहिरी भरणावर भर
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त जलजागृती करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत २८ वेबिनार होऊन त्यातून साडेतीन हजार नागरिकांना माहिती देण्यात आली. पावसाळ्यात छतावरील पाणी वाहून न जाता ते जमिनीत कसे जिरवावे, या विषयी माहिती देत छतावरील हे पाणी शास्त्रोक्त पद्धतीने विंधन विहिरीत कसे उतरवावे, पाणी कशा पद्धतीने अडवावे, या विषयी मार्गदर्शन केले जात आहे. तालुकापातळीवर कार्यशाळा घेण्यासह विविध विभाग, संस्थांच्या सहकार्याने जनजागृती केली जात आहे.
घडीपत्रिकेचे प्रकाशन
जिल्ह्यात जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेमध्ये भूजल साक्षरता अभियानाबाबत सविस्तर माहिती देऊन जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याहस्ते पोस्टर व घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर. लोखंडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढ आहे. मात्र ही वाढ आणखी व्हावी, यासाठी भूजल साक्षरता अभियानांतर्गत जनजागृती केली जात आहे. आता पर्यंत २८ वेबिनार झाले असून त्यातून साडेतीन हजार नागरिकांना माहिती देण्यात आली.
- अनुपमा पाटील, वरिष्ठ भू वैज्ञानिक