ममुुराबाद : उन्हाळा तीव्र झाल्याच्या स्थितीत तापी नदीचे पात्र कोरडेठाक पडल्यामुळे ममुराबाद परिसरातील गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. पंपिंग सेंटरवरील पंप टप्पा घेऊ लागल्याने योजनेवर अवलंबून असणाऱ्या या गावांमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसून आली आहेत. त्यामुळे तापी नदीत हतनूरचे एक आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तापी नदीच्या काठावर नांद्रा खुर्द गावालगत ममुराबादसह परिसरातील सहा ते सात गावांसाठी ३० वर्षांपूर्वी सामूहिक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी उन्हाळ्याची सुरुवात होत नाही तेवढ्यात नदीपात्रातील विहीर तळ गाठते. त्या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी ४१ अश्वशक्तीचे दोन आणि ३१ अश्वशक्तीचा एक, असे तीन पंप तेथे उपलब्ध असले, तरी एका वेळी एकच पंप सुरू असतो. त्यातही पाणी पातळी कमी झाल्यावर पंप दिवसातून काही तास बंद ठेवावा लागतो. परिणामी, ममुराबाद गावापर्यंत तापीचे पाणी पोहोचणे मुश्कील होऊन बसले आहे. नळांना पाणी आले तरी केवळ चार- पाच बादल्या भरतील एवढेच पाणी गावात गेल्या आठवडाभरापासून सोडले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना त्यामुळे वणवण भटकावे लागत आहे. अनेकांवर विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे.
-----------------
नदीत वाळूचा बंधारा घालण्याची गरज
तापीत हतनूर धरणाचे आवर्तन सोडले तरी नदीच्या पात्रात अडविण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने बहुतांश सर्व पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे धरणातून आवर्तन सोडण्यापूर्वी नांद्रा खुर्द गावाजवळ नदीत वाळूचा बंधारा घालणे तितकेच गरजेचे आहे. तरच खाली वाहून जाणाऱ्या पाण्याला अटकाव होऊ शकेल व किमान महिनाभर तरी ममुराबाद परिसरात टंचाई भासणार नाही.
-------------------
(कोट)
तापीवरील पंपिंग दिवसभर चालली तरच संपूर्ण ममुराबाद गावाला पाणीपुरवठा करणे शक्य होते. मात्र, नदीचे पात्र आटल्यावर विहिरीतील पंप टप्पा घेऊ लागल्यानंतर गावातील लहान व मोठे जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरणे आता जिकिरीचे ठरत आहे.
- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद
--------------------
फोटो-
नांद्रा खुर्द येथे तापी नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे ममुराबाद सामूहिक पाणीपुरवठा योजनेवर टंचाईचे संकट ओढवले आहे.