जामनेर : पाण्यासाठी वणवण भटकंती करूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने कर्णफाटय़ाच्या महिलांनी रविवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी रिकामे हंडे नेऊन आपली कैफियत मांडली. महाजन यांनी तातडीने दखल घेत तहसीलदारांना या गावास भेट देऊन चौकशीचे आदेश दिले.कर्णफाटा सुमारे 400 लोकवस्तीचे गाव असून गावात पाणीपुरवठा करणारी टाकीदेखील उभारली गेली आहे. गेल्या वर्षीदेखील ग्रामस्थांना पाणीटंचाईशी मुकाबला करावा लागला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थ पाणीटंचाईने त्रस्त झाले असून, वारंवार तक्रार करूनदेखील प्रशासनाने लक्ष न दिल्याने अखेर गावातील महिला कैफियत मांडण्यासाठी जामनेरला मंत्र्यांच्या निवासस्थानी आल्या.मंत्री महाजन यांनी त्यांची कैफियत ऐकून उद्याच पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यांनी नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांना तातडीने कर्णफाटा येथे जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले.कोटय़वधीचा खर्च व्यर्थ2010 मध्ये एकात्मिक पाणलोट क्षेत्र योजनेतील पाणीपुरवठा योजनेचे काम झाले. यात टाकीचे बांधकाम पूर्ण झाले, 2011 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत वाकडी ग्रुप ग्रामपंचायत कर्णफाटा गावासाठी 1 कोटी 65 लाख 84 हजार 850 खर्चाची योजना मंजूर झाली. या योजनेंतर्गत तोंडापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी येणार होते. मात्र ठेकेदाराने फक्त वाकडीर्पयतच जलवाहिनी टाकल्याने कर्णफाटय़ाला पाणी पोहोचू शकले नाही.गेल्या वर्षी 2016 मध्ये पाणीटंचाईचे गांभीर्य पाहून शासनाने कर्णफाटय़ासाठी 8 लाख 10 हजार खर्चाची तात्पुरती पाणीपुरवठा योजना मंजूर केली.एकूणच पाणीपुरवठा योजनांवर मोठा खर्च होऊनदेखील ग्रामस्थ तहानलेलेच आहेत. रविवारी टंचाईने त्रस्त झालेल्या वंदाबाई पवार, कमल सुरवाडे, केशरबाई माने, शेनफडाबाई माने, कमलाबाई माने, कमलबाई लोखंडे, रेखा पवार, वसंत लोखंडे, राहुल माने, शंकर माने, समाधान माने, संजय शिंदे आदी ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडली. 1 फेब्रुवारी 2017 रोजी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रमेश गायकवाड यांनी लोकशाही दिनातदेखील ही तक्रार सादर केली आहे. वाकडी व कर्णफाटा गावाला तोंडापूर धरणातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आतार्पयत तीन योजना राबविण्यात आल्या. कोटय़वधीचा खर्च झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण न करताच योजना गुंडाळली. संबंधित ठेकेदार हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या कामाची चौकशी करण्यास स्थानिक पंचायत समितीस्तरावर टाळाटाळ केली जाते. राजकीय वरदहस्त असल्याने आपले कुणीही काही करू शकत नाही, अशी मग्रुरीची भाषा ठेकेदाराची आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.आतार्पयत गावातील एकाच्या खासगी विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. मात्र त्यानेदेखील पाणी पुरविणे बंद केले. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. पाणीपुरवठा योजना कूचकामी ठरली आहे. आमची समस्या घेऊन जलसंपदामंत्र्यांकडे आलो. त्यांनी नियमित पाणी पुरविण्याचे आश्वासन दिले व तहसीलदारांना चौकशीसाठी पाठविले.-चंदाबाई पवार, ग्रामस्थ, कर्णफाटामंत्री महाजन यांच्या आदेशाने कर्णफाटा गावास भेट देऊन पाहणी केली. गावाला तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी सुरू करण्यासंबंधी आदेश ग्रामसेवकास दिले आहे. तोंडापूर धरणावरील योजनेचे काम पूर्ण करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.-परमेश्वर कासुडे, नायब तहसीलदार, जामनेर
जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात ‘पाणी टंचाई’
By admin | Published: April 03, 2017 12:49 AM