अमळनेर : तापी, बोरी आणि चिखली या नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या सात्री गावाचा तालुक्यापासून संपर्क २० दिवसांपासून तुटला आहे. गावात जाण्यासाठी नदी ओलांडायला पूल नसल्याने मूलभूत सुविधा ठप्प झाल्या आहेत. वेळेवर उपचाराअभावी येथील एक मजुराचा पाय कापावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तालुक्यात १०७ टक्के पाऊस झाला असून तापी, बोरी आणि चिखली नदीला पूर आला आहे. तालुक्याच्या उत्तरेला तिन्ही नद्यांच्या खोºयात असलेले सात्री हे ९०० लोकसंख्येचे गाव. या गावाला नदी पार करण्यासाठी साधा पूल झालेला नाही. परिणामी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या २० दिवसांपासून सात्री गावाला पाडळसरे धरणाच्या तापी नदीचे बॅक वॉटर, बोरी आणि चिखली नदीच्या पाण्याने वेढा पडला आहे. ग्रामस्थांना थोडे पाणी कमी होताच पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. मात्र बोरी नदीला दररोज पूर कमी जास्त होत असल्याने यावर्षी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत गाव जाहीर झाल्याने या गावचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गावाला १० वर्षांपासून विकास निधी बंद झाला.दरवर्षी गावकरी लोकसहभागातून नदीपात्रात एसटी येण्यासाठी व शेतमाल वाहून नेण्यासाठी माती टाकून कच्चा रस्ता तयार केला जातो. पण यासाठी शासनाने एक रुपयादेखील दिलेला नाही, असे जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी सांगितले.सध्या डांगरी गावापर्यंत बस येत असून पाण्याचा उतार पडला की काही लोक धाडस करून पाण्यातून ये-जा करतात. मात्र जुन्या गावापासून रस्ता २ किमी अंतरावर आहे. चिखल, नाल्या-ओढ्यांना पार करीत जावे लागते. सातत्याने शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने गाव मागासलेले राहिले आहे.उपचाराअभावी पाय गेलासात्री येथील ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील हा मजुरीसाठी डांगरी येथे गेला होता. नदीपात्रातून येताना त्याच्या पायाला काटा टोचल्याने तो जखमी झाला. तसेच वेळेवर उपचार घेऊ शकला नाही. जखमेला बराच वेळ उलटल्याने त्याला गँगरीन झाले.