तालुक्यातील १४ प्रकल्पांमध्येही ठणठणाट
चाळीसगाव तालुक्यातील १४ लघुप्रकल्प सध्या कोरडेठाक आहेत. दोन महिने संपले तरी पावसाचा जोर तालुक्यात कमी असल्याने त्याचा परिणाम या प्रकल्पांवर झाला आहे. हातगाव - १, खडकीसीम, पिंप्री उंबरहोळ, लागला-१, ब्राम्हणशेवगे, पिंपरखेड, कुंझर-२, वाघला-२, वलठाण, राजदेहरे, पथराड व कृष्णापुरी हे लघु प्रकल्प गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ओव्हरफ्लो झाले होते. बोरखेडा व देवळी - भोरस या प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा होता. यंदा जुलै संपून ऑगस्ट सुरू झाला तरी या सर्व धरणांची परिस्थिती नाजूक असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पिके जोमात परंतु दमदार पावसाविना कोमात
गिरणा व मन्याड परिसरात सध्या पिके जोमात दिसत असली तरी वरूण राजाच्या दमदार पावसाविना कोमात गेल्यासारखी दिसत आहेत. दीड दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस नसल्याने पिके फक्त अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरीवर जीव मुठीत धरून बसली आहेत. विहिरींची पातळी जेमतेम वाढायला सुरूवात झाली होती. तोच पावसाने दीड, दोन महिन्याची दांडी मारली. याशिवाय चार, पाच दिवसांपासून रोज सुसाट वारा सुरू असल्याने जमिनीची ओल कोरडी होऊन विहिरींची पातळीही दिवसागणिक खोलवर जात आहे.