जळगाव : जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडते आहे. मात्र अशा परिस्थितीतही टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला अस्वस्थ करून असून आतापासून ४६ गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. यासह टंचाई निवारणासाठी विविध योजनांची अंमलबजावणीदेखील केली जात आहे.गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रारंभीच्या कालखंडात चांगला पाऊस झाला. मात्र नंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला. विविध तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्येही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. केवळ एरंडोल तालुक्यातील काही गावांमध्ये ही परिस्थिती नसल्याचे लक्षात येते.पाण्यासाठी वणवणपाऊस नसल्यामुळे नद्या वाहून निघतील असे पाणी आले नव्हते. याचे परिणाम सिंचन प्रकल्पांवर झाले आहेत. जिल्ह्यातील केवळ हतनूर धरणात बऱ्यापैकी पाणी साठा झाला. गिरणा प्रकल्प जेमतेम २५ टक्के तर वाघूरमध्ये सद्य स्थितीत ३४ ते ३५ टक्के पाणी साठा आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेऊन सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणी हे पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. याचा फटका रब्बी पेºयाला बसला आहे. पाऊस नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची वणवण आतापासूनच सुरू असल्याचे दिसून येत आहे.अनेक गावांना टॅँकरने पाणीगावांच्या पाणी योजना आटल्याने आता तेथे टॅँकरने पाणी पुरवठा केला जावा,अशी मागणी वाढत आहे. परिणामी सद्य स्थितीत ४६ गावांना २८ टॅँकरच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे. गावांमध्ये रात्रंदिवस पाणी पुरवठा करावा लागत आहे. अनेक गावात रात्री उशिराने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे महिला व लहान मुले टॅँकरची वाट पहात असतात. यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ३० गावांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात ८, पारोळा तालुक्यात ४ व जळगाव तालुक्यातील एका गावाला टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.अनेक योजनांची अंमलबजावणीटंचाई निवारण्यासाठी गावांमध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात सार्वजनिक स्त्रोत आटल्याने खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ७१ गावांमधील ७३ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यासह सहा गावांमध्ये तात्पुरती पाणी योजना, तीन गावांमध्ये विहिरी खोल करून पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाची झळ वाढल्यानंतर टंचाईत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात ४६ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:50 AM
दुष्काळाची झळ
ठळक मुद्दे ७३ विहिरी केल्या अधिग्रहीत