लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : नांद्राखुर्द येथील पंपिंग ठप्प झाल्याने गावाला तापी नदीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोईचा सामना करावा लागला. मात्र, ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर प्रयत्न करून नादुरुस्त पंप त्वरित बदलल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली.
सामूहिक पाणीपुरवठा योजनेच्या नांद्राखुर्द येथील पंपिंग स्टेशनवर असलेला सबमर्सिबल पंप काही कारणास्तव नादुरुस्त झाल्यास ममुराबादचा पाणीपुरवठा लगेच ठप्प होतो. दुसरा पर्यायी पंप त्या ठिकाणी बसविल्याशिवाय ग्रामस्थांना पाणी मिळतच नाही. अर्थात, पर्यायी पंप जागेवर असेल तरच पाणीपुरवठा तातडीने सुरळीत होण्याची शक्यता असते. अन्यथा पंप दुरुस्तीच्या प्रक्रियेतच बरेच दिवस निघून जातात. पंप सुरू होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांना पाण्याची वाट पाहत बसावे लागते. सुदैवाने प्रशासकांची नियुक्ती झाल्यापासून तशी वेळ ग्रामस्थांवर सहसा येत नसून पंप नादुरुस्त होताच त्याच्या जागेवर दुसरा पर्यायी पंप बसविण्याच्या दृष्टीने तत्काळ पावले उचलली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ठप्प झालेला पाणीपुरवठा अवघ्या दोन ते तीन दिवसात सुरळीत होऊ लागला आहे. त्याचा प्रत्यय आताही आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
----
(फोटो- २८सीटीआर ४१)
ममुराबाद सामूहिक पाणीपुरवठा योजनेचा तापी नदीवरील नादुरूस्त पंप बदलताना ग्रामपंचायतीचे कर्मचारी.