जळगाव,दि.10- शहरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पिवळ्या व दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार असताना इस्लामपुरात बुधवारी सकाळी लाल जंतू असलेला पाणीपुरवठा झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे मनपाने याची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.
गेल्या दीड-दोन महिन्यापासून शहरात पिवळसर व दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार आहे. संभाजीनगर परिसरात तर काही लोकांना पोटाचे आजारही झाल्याची तक्रार होती. मात्र मनपाकडे याबाबत तक्रार केल्यावर मात्र धरणातील पाणी दूषित झाले आहे. मात्र पाण्याची तपासणी केली असून पाणी पिण्यायोग्य असल्याचे उत्तर मनपाकडून मिळत आहे. याबाबत भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन तक्रारही केली होती.
शनिपेठेतील इस्लामपुरा परिसरात बुधवार, 10 मे रोजी पाणीपुरवठा झाला. त्यात अनेकांकडे नळातून आलेल्या पाण्यात लाल जंतूही आढळून आले. त्यामुळे पाणी पिण्यास कसे वापरावे? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. या जंतुमिश्रीत पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.