चोपडा : शहरात नागरिकांना समान पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून २०५० पर्यंत एक लाख ३५ हजार लोकसंख्येसाठी दरडोई १३५ लीटर प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यासाठी वाढीव पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. शासनाकडून ती मंजुर झाली असून सध्या वेगाने काम सुरू असल्याचे नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.नगराध्यक्षांच्या निवासस्थानी १६ रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रपरिषद घेतली. सद्य:स्थितीत तापी नदीवरील पाणीपुरवठा योजना ही १९९० मध्ये मंजूर झाली. मात्र सध्या शहराची लोकसंख्या ८५ हजार व तरंगती लोकसंख्या पंधरा हजार अशी एक लाखापर्यंत आहे. हा विचार करता दररोज दरडोई १३५ लीटर याप्रमाणे एक कोटी ३५ लक्ष लीटर पाण्याची गरज आहे. या बाबींचा विचार करून २०१७ मध्ये सध्याची योजना वेगाने कार्यान्वित असून त्यासाठी गटनेते जीवन चौधरी यांच्यासह सातत्यपूर्ण पाठपुरवठा केला. शहरावर ९० किलोमीटर वितरण वाहिनी व्यवस्थेचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे नगराध्यक्षा चौधरी म्हणाल्या. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गटनेते जीवन चौधरी उपस्थित होते.