उन्हाळा असल्याकारणाने तीन दिवसाआड पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
पारोळा शहराला तामसवाडी येथील बोरी धरणातून पाणीपुरवठा होत आहे. यावर्षी बोरी धरण १०० टक्के भरले आहे. म्हणून, पाणीटंचाईचा प्रश्न भासला नाही. जुनी मशिनरी असल्याने तांत्रिक अडचणीमुळे बोरी धरणात पाणी असून नागरिकांना मात्र ६ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पाणी मुबलक मिळत असल्याने पाणीटंचाई मात्र नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन होण्याआधी बोरी नदीच्या पात्रात पाणी आवर्तन सोडले जात होते. त्यामुळे खूप पाणी वाया जात होते. परंतु, बोरी धरण ते विचखेडे साठवण बंधाऱ्यापर्यंत पाणीपुरवठा पाइपलाइन झाल्याने पाण्याचा होणार अपव्यय टळला. लाखो लीटर पाणी वाया जात असे व नदीपात्रातून पाण्याची चोरीही होत होती. या सर्व गोष्टींना आता आळा बसला.
शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा होताे. त्याची सवय नागरिकांना झाली आहे. जर शहराला नियमित दोन, तीन दिवसांआड पाणीपुरवठा व्हावा, असे वाटत असेल तर नवीन वसाहतीसाठी नव्याने एक जलकुंभ उभारणे गरजेचे आहे. पूर्वीपासून एकच जलकुंभाद्वारे संपूर्ण गावाला पाणी सोडले जाते. सतत जलशुद्धीकरण केंद्रातून २४ तास पाणी शुद्धीकरण करून एका पाइपलाइनने जलकुंभ भरले जाते, तर दुसऱ्या पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे संपूर्ण गावाला सहा दिवसांत ९ झोनमध्ये पाणीपुरवठा केला जातो.
गावात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी कमीजास्त आकाराच्या पाइपलाइन आहे. जर एकाचवेळी सर्व झोनमध्ये पाणीपुरवठा करण्याचे ठरविले, तर या पाइपलाइन फुटू शकतात. म्हणून गावात ९ झोनमध्ये पाणीपुरवठा करावा लागतो व सर्व झोन पूर्ण होण्यासाठी ६ दिवस पूर्ण लागतात. म्हणून शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असते.
बोरी धरण जरी १०० टक्के भरले आहे, तरीसुद्धा तांत्रिक अडचणींमुळे शहराला एकाच दिवशी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणे शक्य नाही. म्हणून शहराला झोनमध्ये पाणीपुरवठा करणे हा एकच उपाय पालिकेसमोर आहे.
वितरण क्षमतेप्रमाणे पाणीपुरवठा...
जलशुद्धीकरण केंद्राची पाणी शुद्ध करण्याची क्षमता, तेथून जलकुंभापर्यंत पाणी वाहून नेण्याची पाइपलाइनची क्षमता ओळखून हा पाणीपुरवठा केला जातो. सध्या २४ तास जलकुंभ भरणे सुरू असते. तेच पाणी गावात झोनप्रमाणे सोडले जाते. पाणीवितरण क्षमतेनुसार संपूर्ण गावाला पाणीपुरवठा हा केला जात आहे. संपूर्ण गावात ठरलेल्या झोनप्रमाणे मुबलक पाणी शहरवासीयांना दिले जाते.
-करण बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष, नगर परिषद, पारोळा
सद्य:स्थितीत पम्पिंग क्षमता, वितरण व्यवस्था यांची अडचण आहे. या सर्व मशिनरी जुन्या आहेत. पाणीसाठवण क्षमता कमी आहे. शहर वाढले आहे. कनेक्शन वाढले, पाण्याची मागणी वाढली आहे. यामुळे शहराला ६ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. यावर उपाययोजना म्हणून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. त्यात नव्याने जलशुद्धीकरण केंद्र, पम्पिंग हाउस, दोन जलकुंभ व शहरातील अनेक वर्षांपासून असलेली जीर्ण पाइपलाइन बदलविण्यात येणार आहे. मग, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होईल.
-ज्योती भगत पाटील, मुख्याधिकारी, पारोळा