पारोळा/ तामसवाडी, जि.जळगाव : बोरी धरणात गेल्या दोन दिवसांपासून अडकलेले पाण्याचे टँकर शर्थीचे प्रयत्न करूनही निघालेले नाही. टँकर बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आला. पण पुरेशी रोप वायर न मिळाल्याने टँकर अजूनही धरणाच्या पाण्यातच अडकून आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री टँकरचालक बाबासाहेब सोपान राजपूत (३८) हा टँकर भरण्यासाठी धरणात आला. कोरड्या पडलेल्या धरणात टँकर लावून तो कॅबिनवर जाऊन झोपला. रात्री बोरी धरणाच्या वरील बाजूस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बोरी नदीला मोठा पूर आला. धरणात लावलेले पाण्याचे टँकर चाकांपर्यंत बुडून गेले.सकाळच्या सुमारास चालक राजपूत यास ग्रामस्थांच्या मदतीने धरणाच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.पारोळा तालुक्यात बोरी धरणातून ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. २५ रोजी टँकर मालक हरिभाऊ गंगाधर मोरे (रा.उकलगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन क्रेन आणले पण त्याचा काही एक उपयोग होऊ शकला नाही. इकडे धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने क्रेन धरणाच्या पाण्यात उतरू शकले नाही. २०० ते २५० फुटाचा तारेचा रोप वे यासाठी गरजेचा होता. तो उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे तीन तास प्रयत्न करुनही टँकर निघू शकले नाही.
बोरी धरणात अडकले पाणीपुरवठ्याचे टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:11 AM
चालकास ग्रामस्थांच्या मदतीने काढले सुखरुप बाहेर
ठळक मुद्देकिनाऱ्यापासून ७०० फूट अंतरावर टँकर अडकलेले आहे.निम्म्याच्या वर पाण्यात हे टँकर बुडाले आहे.धरणातील पाणी कमी झाल्याशिवाय हे टँकर धरणातून बाहेर काढणे शक्य होणार नाही.