गावकऱ्यांचे हाल : नियोजना अभावी १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराला लागून असलेल्या कुसुंब्यात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली पाण्याची समस्या आजही जैसे थे आहे. गावाच्या वाढत्या लोकसंख्येनुसार विहिरींचे पाणी अपूर्ण पडत असल्यामुळे आणि त्यात वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे गावात १० ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.
कुसुंबा गावासाठी दोन विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या विहिरींमधून सुरुवातीला गावात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी भरले जाते. त्यानंतर एकूण ४५ ‘व्हॉल’द्वारे प्रत्येक परिसरात एक तास या प्रमाणे दिवसभरात तीन ‘व्हॉल’ सोडले जात आहेत. दिवसभरात तीन या प्रमाणे पंधरा दिवसात संपूर्ण ४५ ‘व्हॉल’द्वारे गावात पाणीपुरवठा केला जात आहे.
इन्फो :
गावाच्या लोकसंख्येनुसार विहिरींचे पाणी पुरेना
गेल्या काही वर्षांत कुसुंबा गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सद्य:स्थितीला गावाची लोकसंख्या दहा ते बारा हजारांच्या घरात पोहचली आहे. मात्र, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही विहिरींचे स्त्रोत अपूर्ण पडत आहे. एक टाकी भरण्यासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतो. टाकीची साठवण क्षमताही कमी असल्यामुळे टाकी भरल्यानंतर दोन्ही टाकी मिळून फक्त तीनच ‘व्हॉल’चा पाणीपुरवठा होत आहे.
विजेच्या समस्यांमुळे टाकी भरेना
एक टाकी भरण्यासाठी ६ ते ७ तासांचा कालावधी लागत असून, त्यातही दररोज अधून-मधून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे टाकी भरण्याला अधिकच विलंब होत आहे. त्यामुळे गावातील पाण्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. तसेच विहिरींवरील मोटारींमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
दुष्काळाची आम्हाला सवयच झाली
सध्या गावात १० ते १५ दिवसांआड होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत 'लोकमत प्रतिनिधी'ने गावातील काही नागरिकांशी चर्चा केली असता, त्यांनी कुसुंबा गावात दुष्काळाची समस्या नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गावात पाण्याची समस्या आहे. उन्हाळ्यात तर विहिरींची पाणी पातळी कमी झाल्याने पाण्याची समस्या अधिकच बिकट होते. नागरिकांना टँकरने तर कधी ‘जार’ मागवून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. वर्षांनुवर्ष हीच परिस्थिती आहे. गावातील लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देऊन निवडून येतात, पाण्याची समस्या मात्र अद्याप सोडलेली नाही. त्यामुळे आम्हाला दुष्काळाची सवयच झाली असल्याची भावना या गावातील नागरिकांनी व्यक्त केली.
गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे विहिरींचे पाणी अपूर्ण पडत आहे. टाक्यांची साठवण क्षमताही कमी आहे. यावर उपाय म्हणून नवीन विहीर व टाकी बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन, नागरिकांना नाइलाजाने १० ते १५ दिवसांआड आम्हाला पाणीपुरवठा करावा लागत आहे.
विलास कोळी, उपसरपंच, कुसुंबा
दरवर्षी गावात उन्हाळ्यात पाण्याची समस्या असते. नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.
संजय पाटील, रहिवासी
गावात वेळेवर पाणी येत नसल्यामुळे वापरायचे पाणी कुठूनही आणता येते. मात्र, पिण्याच्या पाण्याचे खूप हाल होत आहेत. गावातून कुठून तरी शोधून पिण्याचे पाणी आणावे लागते किंवा विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
सुवर्णा पाटील, रहिवासी
गावाबाहेरील वामन नगरात अजूनही पिण्याच्या पाण्याची पाईप लाइनही ग्रामपंचायतीने टाकलेली नाही. त्यामुळे आम्हाला बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. तसेच या भागात चांगले रस्तेही तयार झालेले नाहीत. महामार्गावर गाव असतांनाही गावाचा विकास शून्य आहे.
संगीता पवार, रहिवासी