लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील रायपूर येथे गेल्या २० दिवसापासून विजेचा लंपडाव आणि मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहे. महिलांना एमआयडीसीमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अखेर काही महिलांनी थेट ग्रामपंचायतवर मोर्चा नेल्यानंतर २० व्या दिवशी प्रशासनाला जाग येऊन नवीन डीपी बसवून ही समस्या सोडविण्यात आली आहे.
दीड महिन्यांपासून शेतात विजेचा लपंडाव सुरू होता. पाणी पुरवठ्याचाच विद्युत पुरवठा खंडित असल्याने गेल्या २० दिवसांपासून पाण्याची समस्या अगदीच बिकट झाली होती. शिवाय औरंगाबाद रस्त्यावरील जलवाहिनी फुटलेली होती. शेतात वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मुख्य रोहित्र बदलवणे बाकी असल्याने ही विजेची समस्या उद्भवली होती. वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे ग्रामस्थांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. अखेर संतप्त महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत गाठून संबधितांना जाब विचारला, अखेर हालचाली सुरू झाल्या व नवीन रोहित्र बसविण्यात आले व हा गंभीर पाणी प्रश्न सुटला.