फोटो डमी
जळगाव : सध्या कोरोनाचे संकट सर्वांवरच आले आहे. या काळात भीतीपोटी जवळची, नात्यागोत्यातील माणसं दुरावली जात आहेत. दुसरीकडे अशी काही माणसं आहेत की, ती कोरोनाची पर्वा न करता संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. त्यात कोरोना असो की बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य करणारे इसाक बागवान, कोणताही मोबदला न घेता पोलीस अधीक्षक कार्यालय व बाधित पोलिसांच्या घरी जाऊन सॅनिटायझरची फवारणी करणारे हरिश्चंद्र पाटील, गरिबांच्या मुलांची भूक भागविणारे जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
इसाक बागवान, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य
गेल्या वीस वर्षापासून नि:स्वार्थ भावनेने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करीत आहे. मेलेली डुकरे व कुत्री यांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडे यंत्रणा आहे. मात्र, बेवारस मृतदेहांसाठी कोणतीच यंत्रणा नाही. सेवा धर्म म्हणून आपण हे काम करीत आहे. कधीच कोणाकडून एक रुपया घेतलेला नाही. कोरोना काळात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना बाधितांचे मृतदेह स्मशानभूमीत नेण्याचे काम केले आहे. पहिला मृतदेह देखील आपणच नेला आहे. यासाठी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांनी हिंमत दिली होती. तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही.
- इसाक बागवान, जळगाव
हरिश्चंद्र दिलीप पाटील, जळगाव, कोरोना योद्धा
२००९ पासून दोन हजार रुपये मानधनावर पोलीस अधीक्षक कार्यालयात माळीचे काम करीत आहे. गेल्या वर्षापासून कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कोरोनामुळे पोलीस दलातील आठ योद्ध्यांचा बळी गेला. शेकडो पोलीस बाधित झाले. अशा परिस्थितीत पाटील हे रोज पोलीस अधीक्षक कार्यालयात रोज सॅनिटायझर व इतर औषधांची फवारणी करीत आहेत. त्याशिवाय जे कर्मचारी बाधित झाले, त्यांच्या घरासह परिसरात फवारणी करावी लागते. हे काम करण्याचा कोणताही मोबदला मिळत नाही. मोफत हे कार्य करीत आहे. मूळ काम झाडांची निगा राखण्याचे आहे.
पंकज नाले, गरिबांना मोफत अन्नदान
कोरोनामुळे गेल्या वर्षी गरिबांची अनेकांनी भूक भागविली. यंदा मात्र या दातृत्वाचा झरा आटताना दिसत आहे. हीच बाब हेरून जनमत प्रतिष्ठानकडून झोपडपट्टी भागात गरिबांच्या मुलांना मोफत अन्नदान केले जात आहे. तंट्या भिल वस्तीत ३५ परिवारात अन्नदान करण्यात आले. कचरा वेचणाऱ्या कामगारांचीही भूक भागविण्याचे कार्य केले जात आहे.
-पंकज नाले, अध्यक्ष, जनमत प्रतिष्ठान