जळगाव : तपासलेल्या एकूण संशयितांपैकी एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे़ या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचा तपासणी अहवाल हा निगेटीव्ह आला आहे़ ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे सद्यस्थितीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगावची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी दिली़ नागरिकांनी घरीच थांबावे, स्वच्छतेचे नियम पाळावे म्हणजे ही लढाई आपण जिंकू असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.प्रश्न : व्हेन्टीलेटरची सध्या काय परिस्थिती आहे?डॉ़ खैरे : सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ६ व्हेन्टीलेटर आहेत़ त्यातील एक कोरोना कक्षात देण्यात आला आहे़ अनेक सामाजिक संस्थांच्या आपण संपर्कात असून येत्या दोन ते तीन दिवसात चार व्हेन्टीलेटर उपलब्ध होण्याची शक्यता आहे़ यासह संचालकस्तरावरूनही एक व्हेन्टीलेटर खरेदी करण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे़ तसेच आणखी दहा व्हेन्टीलेटरची शासनाकडे मागणी केलेली आहे़प्रश्न : एकंदरित परिस्थिती कशी व आपल्या उपाययोजना काय?डॉ़ खैरे : आजपर्यंत तपासलेल्या एकूण संशयितांपैकी एकच रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे़ एकंदरित इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे़ कोरोनाच्या तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात एक स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग आहे. कोरोना संशयितांसाठीही नेत्र कक्ष विभागात स्वतंत्र २० खाटांचा विभाग आहे. डॉक्टरांच्या क्वाटर्समध्येही आणखी वीस बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ अशा चाळीस बेडचे दोन कक्ष आहेत़ यात सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत़ रुग्णालयाच्या आवारातील अन्य एका इमारतीतही वीस बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे़प्रश्न : आपल्याकडे स्वसुरक्षा किट किती उपलब्ध आहेत? ते कोणासाठी गरजेचे आहेत़डॉ़ खैरे: जे आरोग्य कर्मचारी पॉझिटीव्ह रुग्णाच्या सेवेत आहेत त्यांच्यासाठी हे किट आवश्यक असतात़ एचआयव्ही किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत़ नवीन किट मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे़ मास्क व सॅनेटायझरही पुरेशा प्रमाणात आपल्याकडे उपलब्धता आहेत़ त्यांचा तुटवडा नाही़
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडील परिस्थिती नियंत्रणात - डॉ़ भास्कर खैरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 10:10 PM