लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - ‘राम काज बिन मोहे, अब आराम नही’, अशा शब्दात साधू, संत-महंत, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी राम मंदिर निधी उभारणीसाठी संकल्प केला. शनिवारी पांझरापोळ येथे श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जळगाव जिल्ह्यातील साधू-संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे संत संमेलन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी श्री श्री १००८ महामंडलेश्वर ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली, बेलदारवाडी, श्री श्री १००८ महामंडलेश्वर ह. भ. प. भगवान महाराज, अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव, गोरक्षनाथ आखाड्याचे धर्मशास्त्र विभागप्रमुख योगी दत्तनाथजी महाराज, श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, आडगावचे देव गोपाल शास्त्री, चाळीसगाव वारकरी शिक्षण संस्थेचे ह. भ. प. श्रीकृष्ण महाराज, नंदगावचे जितेंद्र योगी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वेदमंत्रांच्या उद्घोषात शंखनाद करण्यात आला. वेदमंत्रांच्या उद्घोषात दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक एकात्मतेच्या मंत्राने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी संतांचे औक्षण करून स्वागत केले. प्रास्ताविक देवेंद्र भावसार यांनी केले.
निधी समर्पण समितीचे अध्यक्ष ह. भ. प. प्रसाद महाराज यांनी पाठविलेले आर्शिवचन सर्वांना एेकविण्यात आले. योगी दत्तनाथ महाराज यांनी राम मंदिरासाठी अनेकांनी केलेल्या बलिदानाचा इतिहास सांगितला. सर्व संतांनी रामसेवक बनून प्रत्येक व्यक्तीला जागृत करण्याचे आवाहन केले.
जितेंद्र योगी यांनी सर्व संतांना राम मंदिर उभारणीसाठी संकल्प करण्याचे आवाहन केले. देवगोपाल शास्त्री यांनी प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर हे माझे आहे, ही भावना प्रत्येकात असावी, यासाठी हे अभियान असल्याचे सांगितले. ह. भ. प. सुखदेव महाराज, ह. भ. प. जगन्नाथ महाराज सोनटक्के यांनीही मनोगत व्यक्त केले.
या संमेलनाचा समारोप श्री श्री १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाने झाला. ते म्हणाले की, हे अभियान अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येत असून, राष्ट्र मंदिराचे आधारस्तंभ होण्याचे भाग्य आहे. त्यामुळे सर्व समाजाने यात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. सूत्रसंचालन ह. भ. प. संदीप महाराज वाघळीकर यांनी केले. सामूहिक पद्य अंजली हांडे यांनी तर पसायदान अंजली सोनवणे यांनी सादर केले. संतांचा परिचय ॲड. श्रीराम बारी यांनी करुन दिला तर हरिष कोल्हे यांनी आभार मानले.
या संमेलनाच्या यशस्वितेसाठी राकेश लोहार, दीपक दाभाडे, समाधान पाटील, ह. भ. प. योगेश महाराज कोळी, कवी कासार, ह. भ. प. संदीप महाराज महाजन, संध्या तिवारी, कांचन माने, वृषाली जोशी, सपना वानखेडे, जितू राजपूत, सागर माळी, स्नेहल विसपुते, सागर दुसाने, राहुल राजपूत, बापू माळी यांनी परिश्रम घेतले.