जामनेर : उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय निवासस्थानात रुग्णवाहिकेचा चालक महिलेसोबत आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकारात कोविड सेंटरमधील वॉर्डबॉयचादेखील सहभाग असल्याची खुमासदार चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होती.
वॉर्डबॉयला दिलेल्या निवासस्थानात १०८ वरील चालक महिलेसोबत राहत असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू असतानाच आज शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने निवासस्थानाचे कुलूप उघडले असता ते दोघे दिसून आले. या कर्मचाऱ्याने पुन्हा कुलूप लावून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांना बोलाविले व झालेला प्रकार सांगितला. दरम्यानच्या काळात या ठिकाणी मोठी गर्दी झाली. डॉ. सोनवणे यांनी या प्रकाराबाबत पोलिसांना पत्र दिले. पोलीस या ठिकाणी पोहचताच त्यांनी दोघांची चौकशी केली. हवालदार डोंगरसिंग पाटील यांचे फिर्यादीवरून रविशंकर चव्हाण (रा. उपजिल्हा रुग्णालय, जामनेर), जितेंद्र भगवान साळवे (रा. वाडिकिल्ला, ता.जामनेर) यांचेसह महिलेविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११२ व ११७ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
वॉर्डबॉयला दिलेल्या निवासस्थानात हा प्रकार होत असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माहीत होते. मात्र कुणी बोलायला तयार नव्हते. वॉर्डबॉय कुलूप लावून निघून जात असे व खोलीत ते दोघे राहत होते. अचानक आज सकाळी कर्मचाऱ्याने कार्यालयातील किल्लीने कुलूप उघडले असता हा प्रकार समोर आला.
याबाबत वरिष्ठांना कळविणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.