"आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवू, पण निर्णय स्थानिक नेत्यांवरच"
By Ajay.patil | Published: September 15, 2022 08:07 PM2022-09-15T20:07:33+5:302022-09-15T20:08:18+5:30
विरोधी पक्षनेते अजित पवारांची माहिती. ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या बडतर्फीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
राज्यात अडीच वर्षात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस असे मिळून महाविकास आघाडीचे सरकार कायम होते. त्यामुळे आगामी काळात राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याची तयारी आहे. मात्र, अनेकवेळा स्थानिक परिस्थिती वेगळी असते, अनेक कार्यकर्त्यांची इच्छा निवडणूक लढविण्याची असते, त्यामुळे जरी मविआ म्हणून निवडणूक लढविण्याची आमची इच्छा असली तरी हा निर्णय जिल्हापातळीवरील नेत्यांवर सोडण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवारी अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दुपारी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात कार्यकर्त्यांच्या मेळावा झाल्यानंतर पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे, महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की, "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिंदे गट व भाजप एकत्र लढविण्याची तयारी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली तर तिघांची ताकद वाढेल, त्यामुळे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा करण्यात येऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल."
‘त्या’ बकालेंना बडतर्फ करा....
सध्याचे राजकारण तर खालच्या पातळीवर तर गेलेच आहे. मात्र, पोलीस देखील खालच्या पातळीवर बोलायला लागले आहे. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी बकाले यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केले आहे. ते माफ करण्याजोगे नसून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, त्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
शिंदे सरकारला गांभीर्य नाही...
१. अजित पवार यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली, एकीकडे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना राज्य शासन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही.
२. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना, पालकमंत्र्यांना नेमणुका थांबल्या असल्याने शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. निधीच्या परवानग्या थांबल्या आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे रखडून पडले आहेत.
३. राज्यासाठी मंजुर होणारा प्रकल्प गुजरात ला गेला. तरी राज्य शासन लक्ष देत नाही. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार अडचणीत आल्यामुळे आता काहीही आरोप करून या मुद्द्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न राज्यसरकारकडून होत असल्याची टीका पवारांनी केली.
तर उदय सामंत तेव्हा गप्प का होते..?
मविआच्या काळात देखील अनेक उद्योग परराज्यात गेल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. तसेच या उद्योगांची यादीच जाहीर करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले होते. याबाबत पवार यांना प्रश्न विचारला असता मविआच्या काळात सामंत देखील मंत्री होती. मात्र, तेव्हा सामंत गप्प का होते ? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. जर उद्योग गेले तर त्या उद्योगांची यादी जाहीर करण्याचे आव्हान देखील पवार यांनी उदय सामंत यांना दिले.