जळगाव : महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यातून, कृतीतून, कार्यातून समतेचा विचार दिला. बाबासाहेबांनी बुद्धाचं बोट पकडलं व तो अहिंसेचा विचार, मार्ग आपल्याला दाखवला. अहिंसेची कास धरल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. असे विचार जेष्ठ नाटककार व परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी ''फुले-आंबेडकर आणि आपण'' या विषयावर बोलताना व्यक्त केले.
नाशिक येथील पुरोगामी विचार मंच आयोजित या महात्मा फुले जयंती निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या साहित्याचा, विचारांचा सामाजिक कार्याचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील सामाजिक चळवळी वर परिणाम झाला. मराठी रंगभूमीची सुरुवात तंजावरी नाटकांपासून झाली असून,या परंपरेत महात्मा फुले यांचे तृतीय रत्न हे मराठी रंगभूमीवरचे अतिशय महत्त्वाचे नाटक असल्याचे सांगितले. फुले यांनी लिहिलेले ''अखंड'' सत्यशोधकी परंपरा, आंबेडकरी जलसे यासारख्या सांस्कृतिक बाबींकडे सुद्धा शंभू पाटलांनी लक्ष वेधले. क्रांतीचा विचार मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हजारो वर्षांच्या आपल्या समाजावर च्या अन्यायाला वाचा फोडतात आणि या चळवळीत ते तथागत बुद्धाचे बोट पकडतात. बुद्धाचा अहिंसेचा विचार पुढे नेतात बाबासाहेबांचा हाच विचार आपल्याला पुढे न्यावा लागणार आहे म्हणून आपल्याला अहिंसेची कास धरल्याशिवाय आपलं उत्थान होऊ शकत नाही. या साठीच आपल्याला महात्मा गांधी , रामायण , महाभारत पण समजून घ्यावे लागणार असल्याचेही शंभू पाटील यांनी सांगितले.