जळगाव : भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृतीसाठी रेल्वेचे सहकार्य घेण्यात आले असून मतदार जागृतीचा संदेश देणाऱ्या हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसचे जळगाव रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वागत केले. या वेळी शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत जनजागृती केली. त्याला रेल्वे प्रवाशांनीही प्रतिसाद देत ‘आम्ही मतदान करणार...’ असा निर्धार व्यक्त केला.यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार वैशाली हिंगे, शरद मंडलीक, दळवी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा, डी. एम. तोमर, स्तानक प्रमुख अरुण कुमार पाण्डेय, मुख्य तिकिट तपासणीस डी.आर. पाटील, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी, शिक्षणाधिकारी देविदास महाजन, निवडणूक नायब तहसीलदार अनंत कळसकर यांच्यासह निवडणूक शाखेचे व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विविध शाळांचे विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुवारी सकाळी १०.३५ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद रेल्वेचे आगमन झाले. यावेळी मतदान करण्याबाबत आवाहन करणारे फलक प्रदर्शित करण्यात आले होते. प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन विविध घोषवाक्यांद्वारे करण्यात आले. मतदानाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीविषयी घोषणा दिल्या.रेल्वेतील प्रवाशांनी उत्साहाने या उपक्रमाला प्रतिसाद दिला. दारात उभ्या असलेल्या काही प्रवाशांनी आपण मतदान करणार असल्याचे सांगितले. फलाटावर उतरलेल्या प्रवाशांनादेखील मतदानाचे आवाहन करण्यात आले. रेल्वेच्या माध्यमातून मतदार जागृतीचा संदेश दूरवर जाईल, असा विश्वास यावेळी डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला. त्यानंतर उपस्थितांनी रेल्वेच्या पुढच्या प्रवासासाठी हिरवी झेंडी दाखविली.देशभरात लांब पल्ल्याच्या ४ रेल्वेगाड्यांद्वारे मतदार जागृतीचा संदेश देण्यात येत आहे. रेल्वे गाड्यांवर मतदार हेल्पलाईन क्रमांक, मतदानाचे आवाहन, मतदार पोर्टल आदींबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या माध्यमातून ६० पेक्षा अधिक रेल्वेस्थानकावर संदेश देण्यात येत आहे. ही एक्सप्रेस गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, ओडिसा, प. बंगाल या पाच राज्यातून जात आहे.
आम्ही करणार मतदान : रेल्वे प्रवाशांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:29 PM