लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंचतत्त्वाचाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त जिल्ह्याने मिळविलेल्या यशात सर्वांचा सहभाग आहे. हे अभियान संपले असले तरी वर्षभर अभियान पातळीवरच काम केले जाणार असून याद्वारे ‘परिसंस्थेची पुनर्स्थापना’ या पर्यावरण दिनाच्या ब्रीद वाक्यानुसारच वर्षभर काम केले जाईल, असा मनोदय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. यामध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्त्वावर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरणदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने झाला. यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत व सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा गौरव करण्यात आला.
या यशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासीयांचे अभिनंदन करीत सांगितले की, या स्पर्धेसाठी अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक या सर्वांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच जिल्हा या अभियानात आपली छाप पाडू शकला. हे अभियान थांबले असले तरी यात सातत्य राखून अभियान म्हणूनच यापुढेही पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
‘वन आणि वन्य’साठी काम
यंदाच्या पर्यावरण दिनाचे ब्रीद वाक्य परिसंस्थेची पुनर्स्थापना असे आहे. या ब्रीद वाक्यानुसारच काम केले जाणार असून वन तसेच वन्यजीव अशा दोन्ही पातळीवर भर देऊन पर्यावरण व वातावरणीय बदल यादृष्टीने वर्षभर कामे करण्यात येतील. यासाठी सर्वांचा सहभागदेखील महत्त्वाचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.