लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात यंदा संसर्ग अधिकच तीव्र असल्याने दुहेरी मास्क वापरल्यास कोरोनाचा धोका ९५ टक्के कमी होतो, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे डबल मास्क वापरा कोरोना टाळा असेच आवाहन सध्या केले जात आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि आरोग्यविषयक जागरूकतादेखील वाढली. यामध्ये नियमित हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे व मास्कचा वापर करणे या त्रिसूत्रीवर भर दिला जाऊ लागला. यात मास्कचा वापर केल्याने इतरही संसर्गजन्य आजार कमी झाल्याचे वारंवार समोर आले. मास्क वापराविषयी सर्वच पातळीवर जागृती केली जात आहे. मात्र तरीदेखील अनेक जण मास्क वापरत नसल्याने प्रशासनाच्यावतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. यामुळे मास्क वापराचे प्रमाण वाढले तरी यंदा संसर्गही अधिक पसरत असल्याचे समोर आले.
दुहेरी मास्कचा सल्ला
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोनाचा संसर्ग अधिकच तीव्र असल्याने बाधितांची संख्याही वाढत आहे. शिवाय रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणदेखील अधिक वाढल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे या संसर्गापासून बचाव करण्यासाठी दुहेरी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण - १२३८४४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १०३७१
होम आयसोलेशनमधील रुग्ण - ६८२३
मास्क कसा वापरावा
सध्या मास्क तर वापरला जात आहे. मात्र नेमका कोणता मास्क वापरावा याविषयी संभ्रम असतो. यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले की, आरोग्यविषयक कामकाज करणाऱ्या व्यक्तींनी एन-९५ मास्क व त्यावर सर्जिकल मास्क वापरावा. याशिवाय सामान्य नागरिकांनी स्वच्छ धुतलेला कापडी मास्क वापरून त्यावर सर्जिकल मास्क घालावा. एन-९५ मास्क उपलब्ध झाल्यास तो वापरला तरी चालू शकतो. वृद्धांना मास्कचा अधिक वापर केल्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कापडी मास्क वापरावा, असा सल्ला कान, नाक, घसाविकार तज्ज्ञ डॉ. नितीन विसपुते यांनी दिला.
मास्कविषयी अशी घ्या काळजी
- प्रत्येक वेळी सर्जिकल मास्क नवीन वापरावा
- ज्येष्ठ नागरिकांनी घरातही मास्कचा वापर करावा
- कापडी अथवा इतर कोणताही मास्क असल्यास तो स्वच्छ ठेवावा.
हे करू नका
- वापरलेला सर्जिकल मास्क दुसऱ्यांदा वापरू नये
- एन-९५ अथवा इतर कोणत्याही मास्कमध्ये स्पर्श होणार नाही, केवळ मास्कची दोरी पकडावी
- सर्जिकल मास्क ओला होऊ देऊ नये