लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आधुनिक यंत्रणा असतानादेखील हवामान विभाग हवामानाचा व मान्सूनचा अंदाज देण्यात पुन्हा-पुन्हा अपयशी ठरत आहे. यावर्षी देखील मान्सून उशिराने की लवकर येईल याबाबत हवामान विभागातच संभ्रम दिसून आला. जिल्ह्यात १५ जूनपर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात १० जूनलाच जिल्ह्यात मान्सून दाखल झाला. जून महिन्यात पाऊस आपली सरासरी गाठेल असा अंदाज व्यक्त केला; मात्र प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली आहे.
हवामानाच्या नेहमी चुकत असलेल्या अंदाजामुळे शेतीवर देखील परिणाम होत असून,जिल्ह्यात २२ जूनअखेर केवळ १८ टक्केच पेरणी झाली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रावर व लागवड क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाऊस लांबला तर पेरण्या उशिराने होतील व पेरण्या उशिराने झाल्याच तर पुढील रब्बी हंगामावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. उडीद, मूग, सोयाबीनच्या पेरण्या थांबल्या आहेत. तर काही भागात मक्याची लागवड झाली असली तरी पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, जून कोरडा गेल्यामुळे आता जुलै महिन्यात पावसाची सरासरी भरून निघेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे; मात्र एकाच महिन्यात जास्त पाऊस झाला तरी लागवड झालेल्या पिकांना अती पावसाचाही फटका बसण्याची शक्यता राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
..तर खत-बियाणे कसे परवडणार
हंगामपूर्व कापसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असल्याने त्या शेतकऱ्यांचा कापूस तरून जाणार आहे; मात्र कोरडवाहू क्षेत्र असल्याने अजून काही दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागणार आहे.
-रुपेश दिलीप चौधरी, शेतकरी
१५ जूननंतर पाऊस चांगला होईल असा अंदाज होता; मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाचा अंदाज चांगला होता व पाऊस देखील झाला. म्हणून पेरणी केली होती. आता पावसाने पाठ फिरविल्याने दुबार पेरणी करावी लागली तर बियाणे व खतं मिळण्यास अडचणी येतील.
-नचिकेत अरूण चौधरी, शेतकरी
दुबार पेरणी करावी लागली म्हणजे, सर्वच आर्थिक गणित आता बिघडणार आहे. बियाणे-खतं पुन्हा नव्याने घ्यावी लागतील. तसेच उशिराने लागवड झाल्यामुळे उत्पन्नावर देखील परिणाम होणार आहे.
-विजय साहेबराव पाटील, शेतकरी
पीकनिहाय क्षेत्र
कापूस - अपेक्षित क्षेत्र - ४ लाख ९३ हजार ६७५ हेक्टर -
लागवड झालेले क्षेत्र - १ लाख १३ हजार २८९ हेक्टर
मका - अपेक्षित क्षेत्र - ८९ हजार ११८ हेक्टर
लागवड झालेले क्षेत्र - २ हजार ६४३ हेक्टर
उडीद-अपेक्षित क्षेत्र - ३० हजार ४७ हेक्टर
लागवड झालेले क्षेत्र - ७९ हेक्टर
मूग -अपेक्षित क्षेत्र - ३० हजार ४१९ हेक्टर
लागवड झालेले क्षेत्र - १०३ हेक्टर
सोयाबीन - अपेक्षित क्षेत्र - २५ हजार ८१९ हेक्टर
लागवड झालेले क्षेत्र - १८ हेक्टर
पावसाची स्थिती
अपेक्षित पाऊस - १५० मिमी
आतापर्यंत झालेला पाऊस - ७० मिमी
कोठे किती पेरणी
अपेक्षित पेरणी क्षेत्र - ७ लाख ६६ हजार ८७७ हेक्टर
आतापर्यंत झालेली पेरणी - १ लाख ३९ हजार ३२७ हेक्टर