लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. मंगळवारी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची वेबसाईट दुपारी २ वाजेनंतर बंद पडल्यामुळे उमेदवारांना रात्री उशीरापर्यंत सायबर कॅफेवर ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस असून, वेबसाईटला पुन्हा अडचणी निर्माण झाल्यास अनेकांचे अर्ज दाखल होवू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने ३१ पर्यंत मुदतवाढ करावी अशी मागणी आता इच्छुक उमेदवारांकडून केली जात आहे.
ग्राम पंचायत निवडणुकांची धामधुम सुरु झाली आहे. २३ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मात्र, कागदपत्रांची जुळवा-जुळवमध्येच उमेदवारांचे सुरुवातीचे दिवस वाया गेले. त्यातच नाताळसह आलेल्या तीन दिवसाच्या शासकीय सुट्ट्यांमुळे अर्ज दाखल करता आले नाहीत. शेवटचे तीन दिवस शिल्लक असतानाच उमेदवारांची लगीनघाई सुरु झाली आहे. एकत्र लोड येत असल्याने वेबसाईट बंद पडत असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, या अडचणी कायम राहिल्यास शेवटच्या दिवशी देखील इच्छुकांना आपले अर्ज दाखल करणे कठीण होणार आहे.
समाजकल्याणची वेबसाईटही बंद
ग्राम पंचायत निवडणुकीसाठी जातवैधता पडताळणी दाखला देखील आवश्यक आहे. यासाठी कागदपत्रे टाकल्याची पावती तरी उमेदवारांना द्यावी लागते. मात्र, अनेक उमेदवारांकडे हे प्रमाणपत्र नाही. त्यातच समाजकल्याण विभागाची वेबसाईट देखील बंद पडल्याने हे प्रमाणपत्र देखील इच्छुकांना काढता आलेले नाही. यामुळे इच्छुकांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
तहान-भूक विसरून उमेदवार कागदपत्रांच्या जुळवा-जुळवमध्ये व्यस्त
तहसील कार्यालय परिसराला मंगळवारी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना ऑनलाईन प्रक्रियेला अडचणी येत असल्याने इच्छुकांची कागदपत्रांसाठी चांगलीच पळापळ सुरु होती. सायबर कॅफेवर तहान-भुक विसरुन इच्छुक दिवसभर ताटकळत बसले होते. त्यातच रात्री वेबसाईट वेगाने चालत असल्याने रात्री उशीरापर्यंतही थांबण्याची तयारी उमेदवारांची होती. मात्र, संचारबंदीच्या नियमांमुळे सायबर कॅफे चालकांनी कॅफे रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवण्यास नकार दिल्याने अडचणी निर्माण झाल्या.