सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज विश्वनाथ नेमाडे (वय ५३ , रा.रावेर) यांच्या मुलीचे लग्न जळगाव शहरातील भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराडाईज येथे १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांचे नातेवाइकांसह आणि परिवारासह लग्नाला आलेले होते. नवरी मुलीचे सर्व दागिने तिच्या मावशीकडे सांभाळायला ठेवण्यात आले होते. दुपारी १.४३ ते २ वाजेच्या सभागृहात एक व्यक्ती आणि दोन लहान मुलांनी लग्नसमारंभात वऱ्हाडी व्यस्त असताना पिशवीतून एकूण अडीच लाख रुपयांची रोकड व दागिने असा १६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
दाढी वाढलेला पुरुष व दोन मुले कैद या घटनेनंतर नातेवाइकांनी हॉटेल कमल पॅरेटाईजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता निळ्या रंगाचे चौकडी शर्ट व दाढी वाढलेली एक व्यक्ती व त्याच्यासोबत दोन लहान मुले यांची संशयास्पद हालचाल दिसून येत आहे. थोड्या वेळाने हे तिघे जण रिक्षातून बसून निघून गेल्याचेही दिसून येत आहे. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर युवराज नेमाडे यांनी रात्री आठ वाजता शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक विठ्ठल ससे यांची भेट घेऊन माहिती दिली. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. रात्री उशिरा याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत असून पोलिसांचे पथक संशयितांचा शोध घेत आहे.